पुणे - मान्सूनने गुरुवारी केरळमधून आगेकूच केली असून राज्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. दोन दिवसांत मान्सून तळकोकणात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, तामिळनाडू, केरळ राज्यात पाऊस सुरू झाला असून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मान्सूनचे दमदार आगमन झाले. मान्सूनचे केरळ किनारपट्टीवर बुधवारी अधिकृत आगमन झाल्यानंतर दक्षिणेत किनारी भागापर्यंत मान्सूनने २४ तासांत मजल मारली.
द्रोणीय स्थितीचा परिणाम
बाष्पयुक्त वाऱ्यांची दिशा, वेग तसेच समुद्रावरून वाहणारे वारे या संयोगामुळे राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस पडत आहे.