आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून उंबरठ्यावर, दोन दिवसांत आगमन; तापमानही झपाट्याने घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेल्या अडीच महिन्यांपासून भाजून काढणारे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्याची चाहूल लावणारे हवामान बदल वेगाने घडून येऊ लागले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमान-निकोबारवर धडकण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरील हवा बदलत असताना महाराष्ट्रातील तापमान झपाट्याने उतरले आहे. विदर्भात तब्बल 48 अंश सेल्सिअसपर्यंत चढलेला पारा थेट पाच अंशांनी उतरला. मंगळवारी नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक 43 अंशांची नोंद झाली. परभणीत 42 अंश हे मराठवाड्यातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले. जळगाव, मालेगाव, सोलापूर (प्रत्येकी 41 अंश) आणि नगरचा (40 अंश) अपवाद वगळता राज्यात कोठेही तापमान चाळीस अंशांपुढे गेले नाही.

राज्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर मंदगतीचे थंड वारे वाहू लागले. बाष्पयुक्त ढगांची दाटी होऊ लागल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले. मात्र बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता अत्यल्प आहे. तापमानात झालेली घट कायम राहील, असे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

अनुकूल स्थिती
‘गेल्या 24 तासांत अंदमान बेटांवर मुसळधार पाऊस पडला. दक्षिणेतील राज्यांमध्ये येत्या 24 तासांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण अंदमान समुद्रात बंगालच्या उपसागरात मान्सून येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती झाली आहे,’ अशी माहिती पुण्यातील भारतीय हवामान विभागाचे संचालक पी. सी. एस. राव यांनी दिली.

‘महासेन’चा परिणाम
मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आणि राज्यातील ढगाळ हवामानाचा संबंध नाही. बंगालच्या उपसागरातील ‘महासेन’ चक्रीवादळामुळे वातावरण बदलले आहे. सध्या हे चक्रीवादळ विशाखापट्टणमच्या आग्नेयेस 460 कि.मी. बंगालच्या उपसागरात आहे. 16 मेपर्यंत ते बांगलादेशाच्या भूभागावर येण्याचा अंदाज आहे. महासेनमुळे विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

पुढे काय?
साधारणपणे 20 मेच्या सुमारास अंदमानात मान्सून येतो. यंदा ही तारीख एक-दोन दिवसांनी अलीकडे येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये 1 जूनच्या सुमारास मान्सून धडकतो. तिथेही यंदा लवकर मान्सून येण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र त्यामुळे भरपूर पाऊस पडेल, असे मात्र नसते. यंदा 98 टक्के पाऊस (सरासरीइतका) पडण्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे.