पुणे- केरळच्या किनारपट्टीवर 6 जूनला आलेल्या नैऋत्य मोसमी वार्यांनी (मान्सून) वेगवान आगेकूच करत बुधवारी (11 जून) कोकण किनारा गाठला. गोवा ओलांडून मान्सूनने रत्नागिरीपर्यंत मजल मारली असून तळकोकणात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले, ‘मुंबईच्या पश्चिमेला अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती आहे. अरबी समुद्राच्या मध्यात मान्सून सक्रिय झाला आहे. कोकणातील मान्सूनच्या वाटचालीस हे हवामान अनुकूल आहे.’ गेल्यावर्षी मान्सून 4 जूनला कोकण किनार्यावर दाखल झाला होता. यंदा आधीच 7 दिवस उशिरा आलेल्या मान्सूनचा पुढचा प्रवास मात्र अरबी समुद्रातील वादळाने अडखळला आहे.
बुधवारी मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीवरून आगेकूच करत गोवा ओलांडून सिंधुदुर्ग, रत्नागिरीपर्यंत मजल मारली. मध्य अरबी समुद्रातही मान्सूनची आगेकूच झाली. जोरदार पावसाची सलामी देत मान्सूनने गोवा आणि कोकणात आगमन केले. पणजी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी, देवगड, रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकणात मान्सून बरसू लागला असतानाच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडल्या. विदर्भातील उष्णतेची लाट काही प्रमाणात ओसरू लागली आहे.