पुणे - नाशिक, नंदुरबार, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा काही भाग वगळता मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र शुक्रवारी नैऋत्य मोसमी वा-यांनी (मॉन्सून) व्यापला. दरम्यान, राज्याच्या उर्वरित भागातही मान्सून पोहोचण्यास अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.
उत्तर कर्नाटक आणि तेलंगणाच्या उर्वरित भागात मुसंडी मारलेल्या मान्सूनने आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशातही आघाडी घेतली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे कोकण, गोवा, मराठवाड्यात ब-याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले. येत्या 24 तासात कोकण, गोवा व विदर्भात ब-याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आलाय. राज्याच्या बहुतांश भागात मान्सून पोचला असला तरी दमदार पावसास अजून सुरुवात झालेली नाही. कोकण आणि सह्याद्री डोंगररांगांच्या परिसराला अजूनही मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. उर्वरित राज्यातही पाऊस तोकडाच आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्र ते केरळच्या किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने पावसाची शक्यता आहे, असे वेधशाळेने म्हटले आहे.
राज्यातील गेल्या 24 तासातील पाऊसमान
रत्नागिरी - ७, जळगाव - 1, कोल्हापूर - 18, नाशिक - 8, सोलापूर - ७, उस्मानाबाद - 3, परभणी - 15, अंबेजोगाई - 30, परभणी - 10, बीड - 10, वाशिम - 20, महाबळेश्वर - 32, कोल्हापूर - 20 मिलीमीटर.