आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Fund Expense On Western Maharashtra Compare To Other Region

पश्चिम महाराष्ट्रात निधीचा सुकाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पश्चिम महाराष्ट्रातील 37 तालुक्यांमध्ये टंचाईची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील अर्धा डझनहून अधिक मंत्र्यांची गावे असलेल्या राज्याच्या या भागात दुष्काळी निधीचा सुकाळ आहे. पश्चिम महाराष्ट्रात टंचाई निवारणासाठी आतापर्यंत सातशे कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. येत्या जुलैपर्यंत आणखी पंधराशे कोटी खर्च करण्याचे नियोजन तयार आहे.

दुष्काळ निवारणासाठी एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असला तरी दुरगामी कामांसाठी यातली 10 टक्के रक्कमसुद्धा वापरली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. चारा, टँकर, छावण्या या तात्कालिक कारणांसाठीच सर्वाधिक खर्च होतोय. त्याउलट दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असलेल्या मराठवाड्यात केवळ 262 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, आगामी तीन महिन्यात 320 कोटी खर्च करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

सध्या 1733 टॅँकरच्या मदतीने सध्या मराठवाड्याची तहान भागवली जात आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांमध्ये 1130 टँकर सध्या सुरू आहेत. मात्र, यातले फक्त 86 टँकर शासकीय आहेत. उर्वरित पाणीपुरवठा ‘खासगी’ टँकरधारकांच्याच हातात आहे. या टँकरवर झालेला खर्च 177 कोटी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा खर्च अडीचशे कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.


तब्बल 316 कोटींचा चारा
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील जनावरांनी मार्चअखेरपर्यंत 316 कोटी रुपयांचा चारा खाल्ल्याची सरकार दरबारी नोंद आहे. जूनपर्यंत ही जनावरे आणखी 163 कोटींचा चारा खाणार आहेत. चारा छावण्यांची सध्याची संख्या 417 असून त्यात वाढ करण्याची मंजुरीही देण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत चारा छावण्यांवर पाचशे कोटींचा खर्च होईल, असा शासनाचा अंदाज आहे. तर चारा डेपोंवर आजवर अडीचशे कोटी खर्च करण्यात आले आहेत.


‘टँकर लॉबी’चे उखळ पांढरे
दुष्काळामुळे टँकर लॉबीचे उखळ पांढरे झाले आहे. गेल्यावर्षी या भागात 1100 टँकर सुरू होते. यंदा ही संख्या आताच 1130 च्या पुढे गेली आहे. उन्हाळा वाढू लागल्याने पश्चिम महाराष्ट्रात दररोज ८-10 टॅँकर वाढत आहेत. टँकर पूर्ण क्षमतेने भरले जात नसल्याच्या तसेच खेपा अपु-या असल्याच्या तक्रारी वाढत असल्या तरी टँकरचालकांची बिले मात्र फुगत चालली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील 21 लाख 24 हजार 576 लोकांची तहान टँकरवर अवलंबून असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

साखर कारखान्यांचा ‘अ’सहकार
कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी राज्यात जलयुक्त गाव अभियान हाती घेण्यात आले आहे. पश्चिम महाराष्‍ट्रातील एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पाझर तलाव दुरुस्ती, जलस्रोतांमधील गाळ काढणे आदी 2046 कामे या अभियानात पूर्ण झाली आहेत. याच अभियानाअंतर्गत उसासाठी ठिबक सिंचन योजनेस चालना देण्याचे उद्दिष्ट सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आले होते. मात्र, एकाही कारखान्याने यास प्रतिसाद दिलेला नाही.