आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातले सर्वाधिक गुंड नगरसेवक ‘शिवसेना-राष्ट्रवादी’चे, ‘एडीअार’चा निष्कर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील दहा शहरांमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये टक्केवारीचा विचार करता सर्वाधिक गुंड शिवसेनेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दहा महापालिकांमधल्या शिवसेनेच्या २६१ नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्रांची पाहणी केल्यानंतर यापैकी ३० टक्के म्हणजे ७७ नगरसेवकांवर गुन्ह्यांची नोंद असल्याचे दिसून अाले, तर शिवसेनेच्या आणखी ५३ नगरसेवकांनी त्यांच्यावर गंभीर गुन्हे असल्याचे सांगितले आहे. 
 
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुंड नगरसेवक आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या १२९ नगरसेवकांपैकी ३६ म्हणजे २८ टक्के नगरसेवकांवर गुन्हे नोंद आहेत. याच पक्षाच्या आणखी २२ नगरसेवकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्ह्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, दरोडा आदी गुन्ह्यांचा यात समावेश होतो. भाजपच्या सहाशेपैकी शंभर नगरसेवकांवर किरकोळ आणि ६८ नगरसेवकांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.  
 
महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थांनी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी, नागपूर, नाशिक, सोलापूर, अकोला आणि अमरावती या १० मनपातील विजयी १२६८ पैकी १२२० नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले. टक्केवारीच्या अंगाने पाहिल्यास सर्वाधिक गुंडांचा पक्ष ही नोंद मनसेच्या खात्यावर जाते. मात्र मनसेच्या राज्यातल्या फक्त १५ नगरसेवकांच्याच प्रतिज्ञापत्रांची पाहणी झाली आहे. यातल्या ५३ टक्के म्हणजे ८ नगरसेवकांवर किरकोळ, तर ४ नगरसेवकांवर गंभीर गुन्हे आहेत.
 
राज्यातील आठ मनपात सत्ताधारी ठरलेल्या भाजपच्या सहाशे नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्रांची पाहणी केली. यापैकी शंभर नगरसेवकांवर किरकोळ आणि ६८ नगरसेवकांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.  ही टक्केवारी अनुक्रमे १७ आणि ११ टक्के येते. मुंबई, सोलापुरमध्ये मुसंडी मारलेल्या ‘एमआयएम’च्या २३ नगरसेवकांचा अभ्यास असता १७ टक्के नगरसवेकांवर किरकोळ, तर १३ टक्के नगरसेवकांवर गंभीर गुन्हे आहेत. बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षांमधील गुन्हेगारांची संख्या राज्यात सर्वात कमी आहे.  

तीन नगरसेवकांची मालमत्ता शून्य  
प्रतिज्ञापत्रांच्या आधारे नगरसेवकांच्या आर्थिक स्थितीची पाहणीही करण्यात आली. दहा मनपांतील विजयी उमेदवारांची सरासरी मालमत्ता ४.६७ कोटी अाहे. सर्वाधिक कोट्यधीश नगरसेवकांचा पक्ष म्हणून मनसेकडे पाहावे लागते. मनसेच्या १५ पैकी ९ म्हणजेच ६० टक्के नगरसेवक कोट्यधीश आहेत. विश्लेषण केलेल्या १२२० नगरसेवकांपैकी ५२ टक्के म्हणजे ६३९ उमेदवारांनी ते कोट्यधीश असल्याचे जाहीर केले आहे.
 
तर फक्त ३ उमेदवारांनी त्यांची मालमत्ता शून्य असल्याचे घोषित केले आहे हे विशेष. विजयी उमेदवारांपैकी केवळ २९ उमेदवारांनी दोन लाखांपेक्षा कमी मालमत्ता घोषित केली आहे. यंदाच्या निवडणुकीत महिलांचा टक्का वाढल्याचेही दिसून आले आहे. १२२० नगरसेवकांपैकी ५६४ (४६ टक्के) नगरसेवक पुरुष, तर ६५६ (५४ टक्के) नगरसेवक महिला आहेत. 

कोट्यधीशांतही ‘राष्ट्रवादी’ची आघाडी  
पक्ष     संख्या    कोट्यधीश
राष्ट्रवादी    १२९    ७४ (५७ %)  
शिवसेना    २६१    १४६ (५६ %)  
भाजप    ६००    ३१६ (५३%)  
कॉंग्रेस    ११८    ५८ (४९ %)
 
बातम्या आणखी आहेत...