आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Move Wild Animals From Pimpri Chinchwad National Park

खराब पिंज-यांमुळे प्राणिसंग्रहालयातील बिबटे अन्यत्र हलवण्‍याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी उद्यानातील बिबटे तातडीने अन्यत्र हलवण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने उद्यान व्यवस्थापकांना दिले आहेत. वन्यप्राणी ठेवण्यासाठी येथील पिंजरे अयोग्य असल्याचे निरीक्षण प्राधिकरणाने नोंदवले असून, वनखात्याच्या परवानगीने हे बिबटे लवकरच सुरक्षित स्थळी रवाना केले जाणार आहेत.

महापालिकेच्या वतीने 1989 मध्ये चिंचवडच्या संभाजीनगर परिसरात निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यान विकसित केले. उद्यानाचा परिसर सुमारे नऊ एकरांचा आहे. या प्राणिसंग्रहालयात 146 प्राणी व पक्षी आहेत. त्यात सरपटणार्‍या प्राण्यांची संख्या सर्वाधिक 66 आहे. सर्पकुंडात विविध सरपटणारे प्राणी ठेवण्यात आले आहेत. येथील प्राणी व पक्षी पाहण्यासाठी पर्यटक, शालेय सहली सातत्याने येतात.

या प्राणिसंग्रहालयात राजा नावाचा बिबट्या सर्वांचा लाडका बनला होता. तो मेल्यावर जेरी हा नर आणि तारा ही मादी असे दोन बिबटे येथे आणण्यात आले. अकरा वर्षांची ही जोडी सध्या प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण ठरली आहे. या प्राणिसंग्रहालयाचा बृहत विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पाहणी करण्यासाठी आलेल्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने बिबट्यांसाठीचे पिंजरे अयोग्य असल्याचे ताशेरे ओढले आहेत, तसेच बिबटे ठेवण्यायोग्य असे पिंजरे तातडीने तयार करावेत, असे आदेशही दिले आहेत. जेरी आणि तारा हे दोन्ही बिबटे त्वरित योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.