आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडा शर्यत बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करणार- खासदार आढळराव पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- तामिळनाडू व महाराष्ट्रातील काही प्राणीमित्र संघटनांनी प्राण्यांचा क्रूर छळ होतो असा प्रतिवाद केल्याने आज सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली असली तरी मी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचीका दाखल करणार असल्याचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज बैलगाडा शर्यतींवरील बंदी कायम ठेवली आहे. गेल्या वर्षी कोर्टाने या बंदीला स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती उठवल्याने पुन्हा बंदी सुरु झाली आहे. याबाबत खासदार आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, बैसगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गतवर्षी स्थगिती मिळविण्यात यशस्वी झालो होतो. मात्र तामिळनाडू व महाराष्ट्रातील काही प्राणीमित्र संघटनांनी बैलगाडा शर्यतीं दरम्यान प्राण्यांचा क्रूर छळ होतो अशी भूमिका घेतली. या बंदी विरोधात तामिळनाडू सरकार व बैलगाडा मालक संघटनांनी बाजू मांडली. तर महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांच्या वतीने केवळ माझ्याच वकिलांनी बाजू मांडली. परंतु राज्य शासनाने गेल्या 3 महिन्यांत याकडे साफ दुर्लक्ष केले. वास्तविक, महाराष्ट्रात होणाऱ्या बैलगाडा शर्यती दरम्यान बैलांचा छळ केला जात नाही. उलट या बैलांची निगा राखली जाते हि बाब राज्य शासनाने न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडली असती तर माझ्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला बळच मिळाले असते. मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यातींवरील बंदीविरोधात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यात राज्य शासनाला काहीच स्वारस्य नव्हते. उलट लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाही केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी या सुनावणीकडे बारीक लक्ष ठेऊन होतो. प्रचाराच्या धामधुमीतही माझ्या वकिलांशी मी सतत संपर्कात होतो. परंतु राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंद कायम राहावा यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, हि अतिशय दुर्दैवाची बाब आहे. विशेष म्हणजे मागच्यावेळी मी बैलगाडा शर्यतबंदीला स्थगिती मिळविली तेव्हा ती बंदी आपणच उठविल्याचे श्रेय घेणारे फ्लेक्स ज्यांनी लावले आणि या निवडणुकी दरम्यान तथाकथित नेत्यांनी तसे दावेही केले होते. आता हे नेते कुठे आहेत? असे सवाल करीत आढळराव यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात जुन्नर येथे अजित पवारांसह अन्य नेत्यांनी राष्ट्रवादीला मतदान करा नाहीतर पुन्हा बैलगाडा शर्यतींवर बंदी येईल अशी धमकीवजा विधाने केली होती. त्यामुळेच राज्य शासनाने जाणूनबुजून शेतकऱ्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली नसेल ना?? महाराष्ट्र शासनाने जरी शेतकऱ्यांची बाजू मांडून मदत केली नसली तरी मी या बंदीविरोधात कायमच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार असून संपूर्ण देशभरात घातलेल्या बैलगाडा शर्यत बंदीविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचीका दाखल कारून हि बंदी उठविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे आढळराव-पाटील यांनी म्हटले आहे.