आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक व गुंतवणूकदारांना पायघड्या : 'एमपी'चे मुख्यमंत्री चौहान यांच्या पुण्यात गाठीभेटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कुठल्याही उद्योगासाठी जमीन, ऊर्जा, वाहतूक सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. या सुविधांची पूर्वतयारी मध्य प्रदेशने केली असून त्यांचा लाभ घेण्यासाठी आम्ही गुंतवणूकदारांना आवाहन करीत आहोत. उद्योगविश्व आणि आधुनिकतेकडे पाठ फिरवून बसलेली मानसिकता बदलून बदलांना सामोरे जाण्याची आमची इच्छा आहे, असे प्रांजळ मनोगत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडले. उद्योग आणि वाणिज्यमंत्री कैलाश विजयवर्गीय यांनीही गुंतवणूकदारांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक असल्याचे नमूद केले.
मुख्यमंत्री चौहान यांच्यासह आलेल्या शिष्टमंडळाने बुधवारी पुण्यातील उद्योगविश्वातील प्रतिनिधींची बैठक घेतली. तसेच वैयक्तिकरीत्याही अनेक मान्यवर उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये भारत फोर्जचे कार्यकारी संचालक अमित कल्याणी, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर, डी. वाय. पाटील इंडस्ट्रीजचे संचालक अजिंक्य पाटील, सीआयआयचे प्रदीप भार्गव, रणजित नायर, डॉ. अ‍ॅमोस वाइंडर, केबीके ग्रुपचे विनय कोठारी, सुझलॉन एनर्जीच्या तुलसी तंती, सिम्बायोसिसचे डॉ. शां. भ. मुजुमदार आदींचा समावेश होता. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील काही कंपन्यांनीही गुंतवणुकीसाठी उत्सुकता दर्शवली आहे.
उद्योगानुकूल मानसिकता- चौहान म्हणाले की, मध्य प्रदेशातील पूर्वीचे प्रशासन औद्योगिक विकाससन्मुख नसल्याने राज्याचा विकास दर नगण्य होत. मात्र, आम्ही सत्तेवर आल्यावर गेल्या आठ ते दहा वर्षांत औद्योगिक आणि कृषी विकास दरात आघाडी घेतली आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी 20 हजार हेक्टर क्षेत्र राखीव करण्यात आले आहे. प्रशासनाची मानसिकता उद्योगानुकूल केल्यानेच हे शक्य झाले आहे. प्रशासनातील सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय असल्यानेच हे शक्य झाले आहे.
आम्ही करून दाखविले : विजयवर्गीय- वाणिज्यमंत्री विजयवर्गीय म्हणाले, मध्य प्रदेश सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये उत्तम रस्ते, वाहतुकीचे जाळे, ऊर्जेची उपलब्धता, जागेची गरज अशा अनेक मूलभूत घटकांवर सकारात्मक काम केले आहे. त्यामुळे वाहन, कृषी, शिक्षण, औषध निर्माण, प्रक्रिया, वस्त्रोद्योग, आयटी, पर्यटन आणि आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) अशा अनेक क्षेत्रांतील उद्योजक मध्य प्रदेशात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवले आहे. कृषी उत्पादन आयुक्त एम. एम. उपाध्याय यांनी मध्य प्रदेशात सोयाबीन आणि गहू यांच्या उत्पादनातील अग्रगण्य स्थान पाहता अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठ्या गुंतवणुकीच्या संधी असल्याचे सांगितले.