आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी मेनमध्ये अमित शेडगे अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2012 मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. यात सातारा येथील अमित तानाजी शेडगे 588 गुणांसह राज्यात प्रथम आले आहेत. सातारा येथीलच विकास दिंडोराम सूर्यवंशी (545 गुण) द्वितीय, तर तृतीय क्रमांक सतीश विश्वनाथ शितोळे (533 गुण) यांनी पटकावला.

मुलींमध्ये शृंगी नीलेश भास्कर प्रथम (520 गुण), कलाल सचिन उमाजी द्वितीय (520 गुण) व बीड जिल्हय़ातील केजच्या नम्रता देविदास चाटे यांची तृतीय स्थानी (488 गुण) निवड झाली आहे. परतूर येथील अविशकुमार महादेवराव सोनोने (530) गुणांसह मागासवर्गीयांतून प्रथम आले आहेत.

निकालानुसार 42 जणांची उपजिल्हाधिकारी, तर 40 जणांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. 126 जण राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक, जिल्हा उपनिबंधकपदी 9, उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी 7, वित्त व लेखा अधिकारीपदी 31, नगर पालिका मुख्याधिकारीपदी 8, तहसीलदारपदी 36, गटविकास अधिकारी (ग्रुप बी) 3, नगरपालिका मु्ख्याधिकारी (ग्रुप बी) 29, सहायक निबंधक सहकार (ग्रुप बी) 19, भूमी अभिलेख उपअधीक्षक (ग्रुप बी) 6, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक (ग्रुप बी) एक, राज्य उत्पादनशुल्क उपआयुक्त (ग्रुप बी) 2, तर नायब तहसीलदार पदावर 17 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार एमपीएससीने हा निकाल जाहीर केला.

प्रथम आलेले अमित शेडगे सध्या रायगड जिल्ह्यात तळ तालुक्यात नायब तहसीलदार आहेत. गतवर्षी या परीक्षेतून ते नायब तहसीलदार झाले होते. परंतु अभ्यास कायम ठेवून त्यांनी हे यश मिळवले आहे. राहुरीच्या कृषी विद्यापीठातून पदवी घेतलेल्या अमित यांचे वडील तानाजी शेडगे हे दापोली येथे महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता आहेत. द्वितीय आलेले विकास सूर्यवंशी यांचे शिक्षण देवापूर येथे मामा तानाजी बाबर यांच्याकडे झाले. मुंबईत कोकण भवन येथे ते सध्या लेखाधिकारी आहेत.

उमेदवार प्रतिक्रिया

चार दिवस आधीच आई गेली
उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले डॉ. र्शीकुमार चिंचकर म्हणाले, परीक्षेच्या चार दिवस आधीच अचानक आईचे निधन झाले. दु:खी अंत:करणानेच परीक्षा दिली. सुरुवातीपासूनच तयारी केलेली असल्याने यश मिळवू शकलो. जुन्नर येथील चिंचकर यांनी बीएचएमएस शिक्षण घेतलेले आहे.

यूपीएससीपेक्षा अभ्यास सोपा
मूळ परभणी येथील गजानन टोंपे यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. हैदराबादेतून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, तर पुणे विद्यापीठातून एमबीए केलेले आहे. एमपीएससीच्या नव्या अभ्यासक्रमात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास यूपीएससीच्या तुलनेत सोपा आहे. आई-वडिल, पत्नी व मित्रांच्या पाठिंब्याने यश मिळवू शकलो, असे टोंपे म्हणाले.