आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- गेली पंचेचाळीस वर्षे वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार असे नामाभिधान बहाल करणारी ‘मृत्युंजय’ ही कादंबरी पुन्हा वाचकांच्या भेटीस येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने बरेच दिवस मृत्युंजयची आवृत्ती बाजारात नव्हती. मात्र आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने ती प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्रवाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी काँटिनेंटल प्रकाशनच्या अनंतराव कुलकर्णी यांच्याकडे मृत्युंजयची शिफारस केली होती. ती मान्य करून 1967 मध्ये खुद्द माडगूळकरांच्या हस्तेच मृत्युंजयचे प्रकाशन झाले होते. मृत्युंजयच्या सर्व 27 आवृत्या काँटिनेंटलतर्फे काढण्यात आल्या होत्या. सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या साहित्याचे हक्क पत्नी मृणालिनी, मुलगा अमिताभ आणि कन्या कादंबिनी धारप यांच्याकडे आले. त्यांनी हे हक्क 2012 मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांना दिले. त्यावर काँटिनेंटल प्रकाशनाने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयात मेहतांच्या वतीने काम पाहणा-या अॅड. कल्याणी पाठक ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाल्या की, काँटिनेंटल प्रकाशनाने आर्बिट्रेशन क्लॉजअंतर्गत यासंदर्भात योग्य सल्ला येईपर्यंत मेहता पब्लिशिंग हाऊसच्या साहित्य प्रकाशनास स्थगिती मागितली होती. मात्र या प्रकरणी क्लॉज लागू होत नसल्याचे सांगून न्यायालयाने काँटिनेंटलचा अर्ज फेटाळून लावला.
छावा तसेच युगंधरचाही मार्ग मोकळा
‘मृत्युंजय’ची नवी आवृत्ती या महिनाअखेरीस वाचकांच्या हाती पडेल, असे सुनील मेहता यांनी सांगितले. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मृत्युंजयचे मुखपृष्ठ नव्याने केले आहे. सध्या बाजारात मृत्युंजय 450 रुपयांना मिळते. आता ती तीनशे रुपयांमध्ये मिळेल. नव्या आवृत्तीच्या 15 हजार प्रतींपैकी साडेचार हजार प्रतींची नोंदणी झाली आहे. सावंत यांच्या छावा व युगंधर या कादंब -याही नव्याने वाचकांच्या
हातात येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.