आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Highcourt Order To CBI Re investigate Satish Shetty Murder Case

सतीश शेट्टी हत्येचा पुन्हा तपास करा- CBIला कोर्टाचे आदेश, \'IRB\'च्या 21 कार्यालयांवर छापे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचे हत्या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने सीबीआयला दिला आहे. सतीश शेट्टी यांची पाच वर्षापूर्वी हत्या झाली होती. सीबीआयने वडगाव न्यायालयात ऑगस्ट 2014 मध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी सकाळी राहत्या घराजवळ असताना, अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याबाबतचा तपास केला. मात्र कालांतराने या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसच सहभागी असून त्यांनी केलेला तपास संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने विविध ठिकाणी छापे मारत या प्रकरणाची माहिती, कागदपत्रे, संगणकाच्या हार्डडिस्क गोळा केली. तसेच या हत्येच्या संदर्भात माहिती देणार्‍यास दहा लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. सुमारे 500 जणांकडे याप्रकरणाची चौकशी करुन 164 साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली होती.
आयआरबी कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह एकूण 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात येवून, संशयित 23 जणांची लाय डिटेक्टर व पॉलीग्राफ चाचणीही सीबीआयने घेतलेली आहे. तसेच याप्रकरणात आयआरबी कंपनीची बॅँक खाती तपासण्याचा अधिकार मागितला होता. मात्र, सीबीआयने अचानकपणे यू-टर्न घेत याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्याला शेट्टी कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने शेट्टी हत्याप्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश आज दिले आहेत.
बंधू संदीपकडून पाठपुरावा सुरुच- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयआरबीशी संबंध असून ते सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासावर काही परिणाम होईल का, याची विचारणा सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी सीबीआयच्या तपास अधिकार्‍यांकडे केली होती. मात्र आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचे सीबीआय अधिका-यांनी संदीप शेट्टींना सांगितले होते. मात्र, तीन महिन्यांतच सीबीआयने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर यात कुठेतरी पाणी मुरत आहे व आयआरबीचा संबंध असल्याचे सांगत संदीप यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
आयआरबी कंपनीच्या 21 कार्यालयावर छापे- सतीश शेट्टी हत्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या आयआरबी कंपनीच्या कार्यालयांवर सीबीआयने धाडसत्र सुरु केले आहे. मुंबई, पुण्यासह जवळपास 21 ठिकाणी सीबीआयने एकाच वेळी छापे टाकले आहेत. सीबीआयने आयआरबी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह विविध संचालकांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत.