पुणे- मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर आज आणि उद्या ब्लॉक घेतला जाणार आहे. आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील लूज स्केलिंग करून खडकाला जाळ्या बसविण्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग चार टप्प्यात 15 आणि 30 मिनिटांसाठी हा रस्ता ब्लॉक करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. सकाळी 11 वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू होईल.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणार्या लेनवर खंडाळा बोर घाटात खोपोली हद्दीत असणार्या आडोशी बोगद्याच्यावर आणि बोगद्याच्या मुंबईकडील दिशेच्या बाजूला लूज स्केलिंग करून डोंगराला जाळी बसविण्याचे काम केले जाणार आहे. 15 आणि 16 तारखेला प्रत्येकी दुपारी 12 ते 12.15, 1 ते 1.15, 2 ते 2.30 आणि 3 ते 3.30 असे एकूण दीड तासाचे चार ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक मुंबईकडून पुण्याकडे येणार्या मार्गावर घेण्यात येणार असले तरीही गरज पडल्यास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणार्या मार्गावरही हे ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.