आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या वादातून खून, कामशेतची घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंटी वाळूंज - Divya Marathi
बंटी वाळूंज
पुणे- लोणावळा शहराजवळील कामशेत येथे मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळूंज (वय ३४) यांची गोळ्या झाडून हत्या केली. पूर्ववैमनस्य आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर दगडफेक करीत तीन केंद्रे बंद पाडली. तसेच बुधवारी मावळ बंदची हाक देण्यात आली आहे.

बंटी वाळुंज हा कामशेत येथील महाराष्ट्र बँकसमाेर असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. वाळुंज याच्या पाेटाच्या उजव्या भागासह शरीरावर एकूण तीन गोळया लागून तो गंभीररीत्या जखमी झाला. त्यास तातडीने साेमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

मावळ तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदानप्रक्रिया सुरू होती. सदर घटनेची माहिती मिळताच, मनसेचे कार्यकर्ते मोठया संख्येने कामशेत येथे जमले. हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी कामशेत येथे मतदान केंद्रावर दगडफेक केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत बंदोबस्तात वाढ करून, वाळुंज याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालय येथे पाठवले. बुधवारी सकाळी १० वाजता बंटी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वी अप्पा लोंढे या गुंडाच्या टोळीतील एकाचा खून करण्यात आला होता.