आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडदा बाजूला सारून वधूने म्हटले, ‘निकाह कुबूल है’, मुस्लिम वधूचे धाडसी पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - पडद्याआड राहून ‘निकाह कुबूल है’, असे म्हणण्याची इस्लाममध्ये प्रथा आहे. परंतु बारामतीत एका सुशिक्षित कुटुंबाने सुधारणावादी पाऊल उचलले आणि दुल्हन थेट मंचावर आली. सर्वांसमक्ष तिने निकाह कबूल केला.

सरकार महिलांना समान अधिकार देत आहे. मग निकाहदरम्यान मुलींना पडद्याआड का ठेवायचे, असे कुटुंबीयांचे म्हणणे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या विवाह समारंभाला उपस्थिती होती. तरीही उच्चशिक्षित तरुणीच्या धाडसाच्या विरोधात तहसीलसमोर जमावाने या घटनेचा निषेध करत निदश्रने केली आहेत.तालुक्यातील सोनवाडी सुपे येथील सल्लाउद्दीन सय्यद आणि शहेनाज सय्यद या दांपत्याच्या आसमा या कन्येचा रविवारी येथील वृंदावन गार्डनमध्ये विवाह होता. हडपसर येथील सुलतान शेख यांच्या समीर या मुलाशी तो पार पडला. सर्वांसमोर येऊन आसमाने अशा पद्धतीने निकाह केल्याने काही लोक संतप्त झाले. यामुळे इस्लाममध्ये चुकीचा संदेश जाईल असे म्हणत त्यांनी सय्यद कुटुंबाचा निषेध नोंदवला.


इस्लामविरोधी नाही
आम्हाला धर्माचा अभिमान आहे. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आपला देश प्रगतीच्या वाटेवर आहे. स्त्रियांना त्यांचे अधिकार व स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यात इस्लामविरोधी काही नाही. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने विवाह करतो. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांनीही अशाच प्रकारे आपल्या मुलाचा विवाह केला आहे. करिश्मा सय्यद, वधूची बहीण


इस्लामला मान्य नाही
हा निकाह शरियत कायद्याला धरून नाही. इस्लाम धर्म त्याला मान्यता देत नाही. इस्लाममध्ये वधूला मंचावर आणले जात नाही. सामान्य माणसाने हा निकाह लावला. आम्ही सय्यद कुटुंबीयांचा निषेध करतो. हुब्बेदुल्ला काझी, शहर व तालुका काजी, बारामती


मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
इतर समाजात महिला समारंभात मुक्तपणे वावरत असतात. मुस्लिम महिलांना मात्र निकाहसारख्या विधीतही अलिप्त ठेवले जाते. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा बदल घडवला. पुरुषांच्या बरोबरीने वावरण्याची त्यांना संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. सल्लाउद्दीन सय्यद, वधूचे वडील