आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"माय बर्ड, माय प्राइस' - शेतकऱ्यांची पोल्ट्री कंपनी कोंबडी विकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारतातील प्रमुख पोल्ट्री सेंटर्समध्ये गणल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "सिन्नर पोल्ट्री फार्मर्स प्रोड्यूस कंपनी' ची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ४० प्रमुख गावांत चिकन विक्रीची दुकाने सुरू केली जाणार आहेत.

दराच्या बाबतीत पोल्ट्री स्तरावर होणारी शेतकऱ्यांची फसवणूक आणि ग्राहकाला मोजावी लागणारी जास्तीची किंमत या दोन्हीला यामुळे आळा बसणार आहे. कंपनीचे प्रवर्तक योगेश घोटेकर यांनी ही माहिती दिली.

गेल्या चार महिन्यांपासून ब्रॉयलर्स कोंबडीची प्रतिकिलो सरासरी लिफ्टिंग किंमत (शेतकऱ्याला जागेवर मिळणारी किंमत) ५५ रुपये असताना उत्पादक विभागातच रिटेल चिकन विक्रीचे प्रतिकिलो दर १६० ते १८० च्यादरम्यान आहेत. जर कोंबडीची लिफ्टिंग किंमत ५५ असेल तर रिटेलमध्ये ड्रेस्ड चिकनची प्रतिकिलो किंमत जास्तीत जास्त ११० रुपये असायला हवी. मात्र, आजही किरकोळ विक्रेते ५० ते ७० रुपये अधिकचा दर प्रतिकिलो आकारत आहेत. शेतकऱ्याला किलोमागे वीस रुपयांचे नुकसान होत असताना रिटेल यंत्रणा मात्र १०० रुपये नफा मिळवत आहेत.

आमचा रिटेल विक्रेत्यांना विरोध नसून जे विक्रेते लिफ्टिंग रेटनुसार चिकन विक्रीचा बोर्ड रेट कमीअधिक करण्यास तयार असतील, त्यांना जिवंत कोंबड्यांचा पुरवठा केला जाईल. मात्र, जेथे जेथे चिकन विक्री महाग दराने होत असेल, तेथे आम्ही पुढाकार घेऊन दुकाने सुरू करू, असे घोटेकर म्हणाले.
कंपनीचा उद्देश
- सिन्नर तालुक्यातील कोंबडी उत्पादकांना एकत्र आणणे
- कच्च्या मालाची खरेदी आणि कोंबडी विक्रीचे एकत्रित नियोजन करणे
- शासकीय योजना आणि बँक योजनांचा पाठपुरावा करणे
- शासकीय पातळीवरील अडचणी-समस्या संघटितपणे सोडवणे
कंपनीची व्याप्ती
सिन्नर तालुक्यात सुमारे दोन हजार पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत. त्यापैकी २५३ जणांची नोंदणी सिन्नर पोल्ट्री फार्मर्स कंपनीचे शेअरधारक म्हणून झाली आहे. कंपनीकरिता प्राथमिक पायाभूत सुविधा नाबार्डच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. सिन्नर तालुक्याचे कोंबडी उत्पादन पंधरा लाख पक्ष्यांपेक्षा जास्त आहे.
कोंबडी स्वस्त होईल
"सध्याचे बाजारभाव पाहता चिकनचे दर १२० ते १४० च्या दरम्यान असले पाहिजेत. तसे झाले तर ग्राहकालाही कमी पैशात माल मिळेल आणि शेतकऱ्याच्या मालाचा खप वाढून मंदीचे सावट लवकरात लवकर दूर होईल.
- योगेश घोटेकर