आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅक मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅक मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी दिली आहे. राज्यातील इतर कोणत्याही विद्यापीठाच्या तुलनेत आजवरची ही उच्च दर्जाची श्रेणी असल्याने पुणे विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात अव्वल दर्जाचे ठरले आहे. नॅकने विद्यापीठाला ४ पैकी ३.६० सीजीपीए गुण दिले आहेत. याआधी विद्यापीठाला नॅकने ए दर्जा दिला होता.   
 
विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, इमारती, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा यांची दर पाच वर्षांनी तपासणी केली जाते. या तपासणीसाठी नॅकतर्फे समिती नेमली जाते. समिती सदस्यांद्वारे विद्यापीठाची तपासणी केली जाते. त्यानंतर चर्चा होऊन श्रेणी दिली जाते. पुणे विद्यापीठात जानेवारी महिन्यात नॅक समितीचे नऊ सदस्य तपासणीसाठी आले होते.
 
कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी समितीसमोर विद्यापीठाच्या कामगिरीचे सादरीकरण केले होते.  समितीने विद्यापीठातील विविध ज्ञानशाखांच्या विभागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती.
 
 संबंधित विभागप्रमुखांनी व प्राध्यापकांनी त्या त्या विद्याशाखेशी निगडित शैक्षणिक उपक्रम, संशोधन प्रकल्प, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता यांची माहिती समिती सदस्यांना दिली होती. त्यानुसार सदस्यांनी विद्यापीठाला ए प्लस श्रेणी दिली.
 
या दर्जाची व श्रेणीची माहिती नॅकने बुधवारी रात्री उशिरा संकेतस्थळावर जाहीर केली. विद्यापीठाला ए प्लस दर्जा ही अतिशय आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...