पुणे - राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकतर्फे (नाबार्ड) देण्यात येणारे 8 लाख 21 हजार रुपयांचे अनुदान नचरचुकीने गोंदियातील एका महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार लक्षात आल्यानंतरही सदर महिलेने ही रक्कम परत करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी नाबार्डचे सहायक व्यवस्थापक सुनील जहागीरदार यांनी तक्रार दिली आहे.
गोंदियातील एका योजनेसाठी नाबार्डतर्फे आठ लाख 21 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार होते. मात्र, नजरचुकीने हे अनुदान राजेश्वरी दिलीप पाचे (रा. गोंदिया) यांच्या खात्यावर जमा झाले. नाबार्डमार्फत गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील गावात सोशल अॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट (सारडा स्वयंसेवी संस्था) या प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांसाठी 2011 मध्ये निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी जुलै 2012 मध्ये सारडा स्वयंसेवी संस्थेच्या बँक ऑफ इंडिया शाखेवर भरणा करायचा होता. मात्र, नाबार्डच्या नजरचुकीने तो राजेश्वरी पाचे यांच्या खात्यावर जमा झाला.
त्यानंतर नाबार्डने पाचे यांच्याकडे रक्कम परत घेण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे जहागीरदार यांनी पाचे यांच्याविरोधात तक्रार दिली.