आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावपूर्ण वातावरणात शहीद जवानांप्रति कृतज्ञता, नामतर्फे कुटुंबीयांना प्रत्येकी 2.5 लाखांचा स्मरणनिधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या नावाची व्यासपीठावर घोषणा होताच देशासाठी अापला पुत्र अर्पण करणाऱ्या  कुटुंबीयांच्या भावना अनावर होत होत्या आणि त्या भावना समजून घेत संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर ‘नाम’च्या वतीने कृतज्ञता निधी त्या कुटुंबीयांना सुपूर्द करत होते. शहीद  जवानाची माता स्टेजवर येताच नानांनी थेट त्यांचे चरणवंदन केले, तर शहीद जवानाचा आईच्या कडेवरचा मुलगा पाहताच प्रेमाने त्या मुलाला जवळ घेतले.  

हे दृश्य होते गणेश कला क्रीडा केंद्रात झालेल्या कार्यक्रमाचे. ‘नाम फाउंडेशन’च्या वतीने राज्यातील २० शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मदत देण्यात आली. स्वत: पाटेकर यांच्यासह अभिनेते मकरंद अनासपुरे, सुभेदार योगेंद्रसिंह यादव (परमवीर चक्र प्राप्त), जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे प्रमुख कर्नल सुहास जतकर (निवृत्त) व्यासपीठावर उपस्थित होते.    

‘शहीद जवानाचे बलिदान सर्वाेच्च अाहे. त्याला आम्ही काय देणार? पण मागे राहिलेल्यांना किमान एक दिलासा मिळावा एवढाच हेतू यामागे आहे. यातून समाजभावना जागृत होण्याचे काम होते. समाजाकडून मिळालेले समाजासाठीच खर्च करण्याचे व्यसन लागणे ही चांगली गोष्ट आहे. हे कार्य अविरत चालू राहावे यासाठी आम्ही आता महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणार आहोत,’ असे पाटेकर म्हणाले.    

योगेंद्रसिंह यादव यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून कारगिल युद्धाचा थरार कथन केला. ‘मी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी कारगिल युद्धावर रवाना झालो. अनुभव नाही, पुरेशी सामग्री नाही; पण जोश आणि देशभक्तीची भावना यामुळे आम्ही २२ दिवस लढलो आणि अखेर विजयी झालो. सुरुवातीला हा हल्ला दहशतवाद्यांचा असावा असे वाटले होते, पण हेलिकॉप्टर पाडल्यावर हा पाकिस्तानी लष्कराचा हल्ला आहे हे उघड झाले. प्रखर इच्छाशक्ती असेल तर नशीबही साथ देते हे या युद्धाने शिकवले. रोजच्या हल्ल्यामुळे हिंमत न हारता आम्ही लढत राहिलो. जवानाला कोणतीही जात, धर्म नसतो हे आम्ही शिकलो. पण कारगिल युद्धामुळे पाक सैन्याची क्रूरताही दिसली,’ असे यादव यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...