पुणे- मराठी सिनेसृष्ठीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या 'नाम' फाऊंडेशनला पुण्यातील इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या सदस्यांनी सुमारे दीड कोटी रूपयांची मदत केली आहे. याचसोबत पुणे ग्रामीण पोलिस दलाने दोन लाख रूपये दिले आहेत. ही रक्कम मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्या केलेल्या 1 हजार कुटुंबियांना प्रत्येकी 15 हजार रूपयांप्रमाणे दिली जाणार आहे.
यावेळी नाना पाटेकर म्हणाले, आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना मदत देऊन अपंग करायचे नाही. त्यांना पैसे देण्याची सवय लावायची नाही. हे पैसे आपण फक्त त्यांना दुबार पेरणीसाठी देत आहोत. याची त्यांना जाणीवही करून दिली जात आहे. आता शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पण उद्या त्यांची मुले नैराश्यातून नक्षलवादाकडे वळली तर काय करणार? त्यासाठी त्यांच्यासाठी अगोदर काही तरी केले पाहिजे. शेतात काही पिकत नाही म्हणून शहरात जाऊन काही हमाली व किरकोळ कामे करणा-यांना पुन्हा गावाकडे आणून आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी आमची संस्था प्रयत्न करणार आहे. शेतक-यांना मदत करण्यास आम्ही छोट्या स्वरूपात सुरुवात केली मात्र आज की चळवळ उभी राहिली आहे. राजकर्त्यांना मागील 67 वर्षात जे जमले नाही ते आपण येत्या काही वर्षात करू शकतो असा विश्वास यातून आला आहे.
यावेळी लायन्सचे प्रांतपाल श्रीकांत सोनी, जिल्हाध्यक्ष शैलेश शहा, समन्वयक डॉ. सतीश देसाई, अध्यक्ष शाम अग्रवाल, पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. जय जाधव, राजकुमार शिंदे, महादेव बाबर आदी उपस्थित होते.