आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या संस्कारामुळे गुन्हेगारीपासून दूर राहिलो - नाना पाटेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माझ्या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे आणि माझा मामेभाऊ म्हणजे मन्या सुर्वे (मुंबईतील पूर्वीचा कुख्यात गुंड), त्याचे आमच्यावर सावट पडू नये म्हणून लहानपणीच आईने आम्हाला मुंबईतून मुरूड-जंजिर्‍यास राहण्यास नेले. आई -वडील मुलास कशा प्रकारे घडवू पाहतात याचे हे उत्तम उदाहरण. मी लहानपणी वात्रटपणा केला; पण घरातील संस्कारामुळे गुन्हेगारीकडे कधीही वळलो नाही, असे सांगत अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

पोलिस रेझिंग डेनिमित्त पुणे पोलिसांतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘संवाद परिवर्तनाचा’ या विषयावर नाना बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, पोलिस आयुक्त सतीश माथूर आदी यावेळी उपस्थित होते. नाना म्हणाले, आपली जात, धर्म कोणता ही बाब आपल्या हातात नाही. मात्र, आपल्यावर होणारे संस्कार आपल्या हातात आहेत. एखाद्याच्या हातून गुन्हा घडणे ही गंभीर बाब नाही. मात्र, त्यातून सावरणे अतिशय महत्त्वाचे आहे. गुन्हा म्हणजे अनवधानाने आपल्याकडून झालेली चूक असते. तो वारंवार होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्यामध्ये भिडण्याची वृत्ती नेहमी जागृत असायला पाहिजे. तिचा वापर चुकीच्या ठिकाणी झाला तर तो गुन्हा होता आणि योग्य ठिकाणी झाल्यास ते शौर्य ठरते, असेही ते म्हणाले.

केंद्र, राज्यात आश्वासक बदल
मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मात्र, केंद्र आणि राज्यात सध्याचे सरकार ज्याप्रकारे काम करत आहे ते पाहून आगामी चार-पाच वर्षांत आश्वासक बदल होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली असून त्यांनी उत्तम कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे. काही राजकारणी कसे बोलतात, काय वागतात, माजल्यासारखे बोलतात हे समाजाने पाहिले पाहिजे. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या अंगावर दुसर्‍या दिवशी सूट कसा अंगावर येतो. त्यांची संपत्ती कशी वाढते याबाबत आपण विचारणा केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

तरीही चित्रपटसृष्टीत कार्यरत
माझाहा चेहरा घेऊन मी चित्रपटसृष्टीत ४२ वर्षे कार्यरत आहे. मी खूप शिव्या देतो, अनेकांशी भांडतो; पण हे लोक मला सारखे सारखे चित्रपटात का घेतात, याचाच मी विचार करतो. तेव्हा समजते की, आपले नाणे खणखणीत आणि स्पष्ट आहे. सरतेशेवटी आपल्याजवळ जी गोष्ट आहे त्याचे कौतुक करता आले पाहिजे. प्रकाश आमटे हा चित्रपट करताना ती भूमिका कशी करू, असे विचार मनात आले नाहीत. ती भूमिका सहजपणे साकारली गेली. या चित्रपटाला मिळणार्‍या प्रतिसादाचे श्रेय हे मंदा आणि प्रकाश आमटे यांच्या कार्याचा गौरव आहे.