आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane Critcs On Sharad Pawar, Ajit Pawar At Indapur

राष्ट्रवादी ही उपद्रववादी पार्टी- नारायण राणेंची इंदापूरमध्ये अजित पवारांवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही उपद्रववादी पार्टी आहे. या पक्षाचे राजकारणच पाडापाडीचे व फोडाफोडीचे आहे. कारण या पक्षात गावागावांतून ओवाळून टाकलेले लोक आहेत, अशी जहरी टीका माजी उद्योगमंत्री नारायण राणेंनी राष्ट्रवादीवर केली आहे. राणे इंदापूरमधील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी राणेंनी राष्ट्रवादीसह अजित पवारांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
राणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी आहे हे सर्वांनाच माहित आहे. या पक्षाने आजपर्यंत लुटालुटीचे, पाडापाडीचे व फोडाफोडीचेच काम केले आहे. आताच्या लोकसभेवेळी पवार काका-पुतण्यांनी कुरघोड्या करून माझा मुलगा निलेशला पाडलं. काँग्रेसला थांबून राष्ट्रवादीला मोठा पक्ष करण्याचा अजित पवारांचा डाव आहे. पण तो कधीच यशस्वी होणार नाही. अजित पवार आयुष्यात कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत. त्यांच्यात त्याची ना गुणवत्ता आहे ना क्षमता. मूळात या पक्षातच गावागावांतून ओवाळून टाकलेले लोक आहेत, अशी टीका राणेंनी केली.
आर आर पाटलांना लक्ष्य करताना राणे म्हणाले, 'आर आर'ने पोलिस खात्याची पार वाट लावून टाकली. आरआरचा कसलाही वचन नाही. नाहीतरी पोलिसांकडे तंबाखू मागणा-या गृहमंत्र्यांचा वचक कसा काय पडणार, अशी टिप्पणी राणेंनी केली. भाजपवर हल्लाबोल करताना राणे म्हणाले, भाजपने 60-70 उमेदवार आयात केले आहेत. भाजपमध्ये ना नेते चांगले आहेत का लढायला कार्यकर्ते. त्यामुळेच त्यांना आयातगिरी करावी लागत आहे. लोकसभेत भाजपचे असलेले 98 खासदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. अशा भाजपला राज्यात थारा देऊन नका असेही राणेंनी सांगितले.
इंदापूरमध्ये काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी जबरदस्त आव्हान निर्माण केले आहे. मागील निवडणुकीत भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना घाम फोडला होता. 2009 मध्ये अपक्ष उभे राहिलेल्या भरणेंनी तब्बल 86 हजार मते मिळवली होती तर, काँग्रेसच्या तिकीटावर उभे असलेल्या हर्षवर्धन पाटलांना 92 हजार मते मिळाली होती. त्यावेळी हर्षवर्धन केवळ 6 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. आता तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने भरणे व हर्षवर्धन यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. राष्ट्रवादी पक्ष इंदापूर तालुक्यात प्रथमच भरणेंच्या मागे खंभीरपणे उभे असल्याने मागील 20 वर्षापासून राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या पाटलांचा अनपेक्षित धक्कादायक पराभव होऊ शकतो असे बोलले जात आहे.