आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीरेंद्र तावडे सूत्रधार तर सारंग अकोलकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या- CBI चा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातनचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा निष्कर्ष सीबीआयने तपासातून काढला आहे. तसेच सध्या फरार असलेला पुण्यातील साधक सारंग अकोलकरनेच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावाही सीबीआयने केला आहे. तावडे व अकोलकर हे मागील पाच वर्षापासून सतत एकमेंकाच्या संपर्कात असल्याचे बाब त्यांच्या ई-मेल तपासणीतून उघड झाले आहे.
वीरेंद्रसिंह तावडेच्या विरोधात त्याचे ई-मेल संभाषण हाच प्रमुख पुरावा ठरू शकतो ही बाब लक्षात घेऊन सीबीआय पथकाने याच अंगाने तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोलकर हत्येच्या कटात तावडे आणि अकोलकर या दोघांसह आणखी तीन जण सहभागी असल्याचा सीबीआयला संशय असून त्याबाबतचे काही दुवे तावडेच्या ई-मेल संभाषणाद्वारे मिळतात का, याचा कसून तपास सुरू आहे.
वीरेंद्र तावडे हा 2008 ते 2013 या कालावधीत म्हणजे दाभोलकरांच्या हत्येपूर्वीपर्यंत फरार असलेल्या सारंग अकोलकरच्या नियमित संपर्कात असल्याची बाब सीबीआयच्या चौकशीतून समोर आली आहे. सनातन संस्थेशी संबंधित असलेला अकोलकर हा गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी आहे. या दोघांमध्ये अनेकदा ई-मेलद्वारे झालेल्या संभाषणात हत्येसाठी हत्यारांची तजवीज करण्याबाबतचे किंवा गावठी हत्यारे तयार करणारा एखादा छुपा कारखाना उभारण्याबाबतचे अनेक उल्लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच या कारखान्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या उभारणीबाबतही या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गावठी हत्यारांपेक्षा विदेशी हत्यारे किती उपयुक्त ठरतात, या विषयांवरही या दोघांमध्ये एका ई-मेल संभाषणादरम्यान चर्चा झाल्याची माहिती सीबीआयच्या हाती लागली आहे. त्यादृष्टीने पथक पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्राचा इन-चार्ज होताच तावडेंने 'प्रोजेक्ट दाभोलकर'वर काम सुरु केले-

2001 मध्ये सनातन संस्थेसोबत काम करू लागलेल्या वीरेंद्र तावडेला 6 वर्षांनी म्हणजेच 2007 साली पश्चिम महाराष्ट्राचा इन-चार्ज बनविला होता. तसेच त्यावेळी तावडेला दाभोलकरांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले होते. तावडे आणि सारंग अकोलकर यांच्यातील असे 18 ई-मेल सीबीआयच्या हाती लागले आहेत ज्यात दाभोलकर यांचा उल्लेख आहे. तसेच 2010 सालातील तीन ई-मेलमध्ये दाभोलकरांबाबत 'कोडवर्ड' मध्ये माहिती दिली गेल्याचा सीबीआयचा दावा आहे. तावडे व अकोलकर यांच्याशिवाय आणखी तिघांचाही यात हात असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
पाच जणांच्या सहभागाचा संशय-
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात तावडे आणि अकोलकर यांच्यासह आणखी किमान तीन जणांचा सहभाग असल्याचा सीबीआयला संशय असून त्या दिशेने तपास सुरू आहे. या पाच जणांच्या अनेकदा गुप्त बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीत हत्येच्या नेमक्या वेळेबाबतच अनेकदा चर्चा झाल्याची बाब तपासादरम्यान समोर येत आहे.
पुरावे उभारणीवर तपासयंत्रणांचा भर-
सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे याचा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सहभाग असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे उभारण्यावर सीबीआयने भर दिला आहे. कारण याअगोदर अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये सबळ पुराव्यांच्या अभावाचा फायदा आरोपीला मिळाल्याची अनेक उदाहरणे समोर आली असल्याने याप्रकरणी सुरुवातीपासूनच हा प्रयत्न असल्याचे सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पुढे वाचा, दाभोलकरांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वीरेंद्र तावडे आहे कोण?
बातम्या आणखी आहेत...