आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Dabholkar News In Marathi, Divya Marathi, Pune

अंनिस 20 ऑगस्टला करणार देशभर निषेध, डॉ. दाभोलकर हत्येचा वर्षभरानंतरही तपास शून्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही मारेक-यांच्या तपासाची प्रगती शून्य आहे. पोलिस, शासन व संबंधित यंत्रणांना या तपासाचे गांभीर्यच वाटत नाही, असा आरोप दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी येथे केला. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी याचा देशभर निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.

पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांत तसेच दिल्लीसह देशांतील दहाहून अधिक राज्यांतून निषेध केला जाणार आहे. अंनिस लोकरंगमंचातर्फे 20 गटांतर्फे सलग पाच तासांचे रिंगणनाट्य प्रयोग सादर होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी दिली. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सर्व कलाकार एकत्र येत आहेत. अंधश्रद्धा या कल्पनेवर वीसहून अधिक नाटके, गाणी लिहिली आहेत.

20 गावांतील 250 कलाकार ती सादर करतील. पुण्यातील प्रयोगाला डॉ. श्रीराम लागू, नसीरुद्दीन शहा उपस्थित राहणार आहेत. लवकरच गटांची संख्या 50 होईल आणि सुमारे एक हजार कलाकार हे रिंगणनाट्य सर्वत्र नेतील.

डॉ. दाभोलकर स्मृतिविशेषांक
साधना साप्ताहिकाचा 67 वा वर्धापन दिन अंक हा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिविशेषांक म्हणून प्रकाशित होणार आहे. या अंकाचे प्रकाशन 18 ऑगस्टला पुण्यात होणार आहे. यानिमित्ताने आधुनिक महाराष्ट्रातील विवेकवादाची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत सुमंत यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे असतील.