पुणे - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा कळसबिंदू पुणे जिल्ह्यात गाठला जाईल. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या शिवारात धडक मारणार आहेत. मोदींची सभा ९ तारखेला थेट पवारांच्या गावात म्हणजेच बारामतीत तर राहुल यांची सभा बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर येथे १० तारखेला होईल. या दोन्ही मतदारसंघांमध्ये मोदी-राहुल या दोघांचा प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसच असणार आहे.
प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस-भाजप या राष्ट्रीय पक्षांचे एकमत आहे. यामुळेच मोदी आणि गांधी यांच्या सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. मोदी यांच्या सभेमुळे बारामतीत अजित पवारांचा पराभव होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पवारांच्या गावात जाऊन त्यांच्याविरोधात सभा घेऊन राष्ट्रवादी व भाजप यांची छुपी युती नसल्याचा स्पष्ट संदेश राज्यभर पोहोचवण्याचा मोदींचा प्रयत्न असणार आहे, तर पुरंदरमध्ये सभा घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना चेतवण्याचा प्रयत्न राहुल करतील.
२००९ मध्ये राष्ट्रवादीचे २५ आमदार एकट्या पश्चिम महाराष्ट्रातून आले. आताच्या लोकसभेतही निवडून गेलेले राष्ट्रवादीचे चारही खासदार पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीचा प्राण असलेल्या या भागावर मोदी यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तासगाव, कोल्हापूरानंतर आता बारामती, पिंपरी आणि पंढरपुरात मोदी सभा घेणार आहेत.
पवारांच्या बारामतीत सभा घेऊन राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही प्रचारादरम्यान मोदींना लक्ष्य केले आहे. याचा समाचार मोदी बारामतीत कसा घेतात, याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे.
‘शिवनेरी'वर जाणार मोदी : पुणे दौ-यावर येणारे नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला, किल्ले शिवनेरीलाही आवर्जून भेट देणार आहेत. छत्रपतींच्या जन्मस्थळावर माथा टेकवून मराठी मनांना साद घालण्याचा प्रयत्न मोदी करतील, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
बारामती आणि पंतप्रधान
इंदिरा गांधी, राजीव गांधी, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा या पंतप्रधानांनी बारामतीत येऊन शरद पवारांचा पाहुणचार घेतलाय. मात्र, पवारांना कडवा राजकीय विरोध करण्यासाठी, त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मोदी यांच्या रूपात पहिलेच पंतप्रधान बारामतीत येत आहेत.
१९९९ आणि २०१४
‘विदेशी वंशाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीत
सोनिया गांधींना विरोध केला. नंतर पवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. १९९९ च्या विधानसभा निवडणूक प्रचाराला सोनिया गांधींनी बारामती लोकसभा मतदारसंघात भोर येथे सभा घेतली होती. राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्याने पवारांनी पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेतले आणि १९९९ मध्ये सत्ता मिळवली. पंधरा वर्षांनी पवारांनी पुन्हा काँग्रेसला दूर लोटले आहे. आता राहुल गांधींनीही सभेसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचीच निवड केलीय. यातून राज्यभर योग्य तो संदेश जाईल.’
– देविदास भन्साळी, काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष.