आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण मनी मेकिंग मशीन नव्हे मॅन मेकिंग मशिन झाले पाहिजे -नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतीय शिक्षण मॅन मेकिंग मिशन होते. आता शिक्षण मनी मेकिंग मशीन झाले आहे. या परिस्थितीत बदल व्हायला हवा, असे सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) तरुणाईच्या हृदयाला हात घातला. परंतु, जगातील समस्या सोडविण्यासाठी भारतीय युवाशक्तीचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज आहे, असे वक्तव्य त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते.

भाषणातील प्रमुख मुद्दे

आपली प्राथमिकता आपण ओळखली पाहिजे. समस्यांचे समाधान आहे. केवळ समस्या सोडविण्याचा मनापासून उद्देश हवा.

कॉमनवेल्थ गेम्समुळे भारताची प्रतिमा जगभरात मलीन झाली आहे. या गेम्सच्या आयोजनात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला. त्याची आता चौकशी सुरू आहे. असे असले तर आपण ऑलिंपिक आयोजनाकडे वाटचाल कसे करणार.

भारतीय शिक्षणाला उच्च परंपरा लाभली आहे. त्यात आधुनिकता यायय हवी. परंतु, असे करीत असताना त्यात पाश्चिमात्यकरण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

आज शिक्षण मॅन मेकिंग मशिन नव्हे तर मनी मेकिंग मशिन झाली आहे. या परिस्थितीत बदल झाला पाहिजे. शिक्षणाचा उपयोग करून आपण भरीव विकासात योगदान दिले पाहिजे.

भारतीय शिक्षण पद्धतीची दयनिय अवस्था आहे. भारतातील तरुणाईत निराशा पसरली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी चांगल्या उद्देशांसह कुणीतरी पुढे यायला हवे. जगाला दिशा देण्याचे समार्थ्य भारतीय तरुणाईत आहे.

जगातील समस्या सोडविण्यासाठी भारतीय युवाशक्ती कामी येऊ शकते. भारतात मोठ्या संख्येने युवक आहेत. त्यांचा राष्ट्रनिर्माण कार्यात पुरेपुर उपयोग करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज आहे.

पुणे ही पवित्र भूमी असून येथे भाषणाचा मला सन्मान मिळाला आहे. त्याचे मला समाधान आहे. पुणे ही राष्ट्रनिर्माण कार्यात मोलाची भूमिका बजावलेल्या नेत्यांची भूमिका आहे. मी या भूमीला सलाम करतो.

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज पुण्यात झाली. मात्र, आगमनापूर्वीच मोदींनी ‘फेसबुक’च्या माध्यमातून पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद सुरू केला होता तसेच त्यांची ‘मीडिया टीम’ही शहरात दाखल झाली आहे.

चार वर्षांच्या खंडानंतर मोदींची पुण्यात सभा झाली आहे. सभेपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयातील अ‍ॅम्फी थिएटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. सायंकाळी सिंधी समाजाचे आदरस्थान साधू वासवानी यांच्या नावाने सुरू होणा-या नर्सिंग महाविद्यालयाचे उद्घाटनही करणार आहेत. तत्पूर्वी स्वत: मोदी यांनी ‘फेसबुक’च्या माध्यमातून ‘मी उद्या पुण्यात येतोय’ ही वर्दी पोस्ट केली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ‘शिक्षण आणि विकास’ या विषयावर संवाद साधणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले होते. देशाच्या विकासासाठी ‘परस्परांमधला विश्वास कसा वाढवावा’ या विषयावर मला तुमची मते जाणून घ्यायची आहेत, असे आवाहन मोदींनी फेसबुकवरून केले होते. या पोस्टला शनिवारी सायंकाळपर्यंत तब्बल साडेअकरा हजार विद्यार्थ्यांनी ‘लाइक’ केले, तर 1210 विद्यार्थ्यांनी त्यांची मते व्यक्त केली होती. ‘या उदंड प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभारी आहे. देशाच्या भविष्यासाठी मला तुमच्याकडून आणखी कल्पना हव्या आहेत. फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुमच्यासमोर आणि जगभरातल्या प्रेक्षकांसमोर माझी मते मांडायला मला आवडेल,’ असेही मोदींनी म्हटले होते.


कार्यक्रम निवडीतले कौशल्य
साधू वासवानी आश्रम हा सिंधी समाजाचे आदराचे स्थाने. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा एकही पुणे दौरा या आश्रमाला भेट दिल्याखेरीज पूर्ण होत नाही. आश्रमाचे गुरू दादा वासवानी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन मोदी करणार आहेत. या माध्यमातून मोदींनी सिंधी समाजाशी ऋणानुबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. प्रखर हिंदुत्ववादी वि. दा. सावरकर विद्यार्थिदशेत या वसतिगृहातल्या ज्या खोलीत राहत त्या खोलीच्या दर्शनासाठी त्यांनी आवर्जून वेळ राखीव ठेवला आहे.


मीडिया टीमचा लवाजमा
मोदींच्या कार्यक्रमाची जगभर प्रसिद्धी करण्यासाठी त्यांची मीडिया टीम एक दिवस आधीच शहरात दाखल झाली आहे. त्यात कॅमेरामन, फोटोग्राफर आणि सोशल मीडिया एक्स्पटर्सचा समावेश आहे. तसेच मोदी यांच्या संरक्षणासाठी गुजरात पोलिसांची आणि राष्‍ट्रीय सुरक्षा गाडर्स यांची स्वतंत्र टीमही आली आहे.