आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Challenges Congress Leadership For Elections

महाराष्‍ट्राच्‍या सरकारला केंद्रात पत नाही; नरेंद्र मोदींची मुख्‍यमंत्र्यांवर टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कॉंग्रेसच्‍या घराणेशाहीने देशाचे वाटोळे केले असून जातीयवादाच्‍या नावाखाली देशाच्‍या मुलभूत प्रश्‍नांना कॉंग्रेसने सातत्‍याने बगल दिली आहे. कॉंग्रेसमुक्तीशिवाय देश मुक्त होणार नाही. या, आता थेट लढू, असे सांगून गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला थेट आव्‍हान दिले.

नरेंद्र मोदी पुण्‍यातील जाहीर सभेत बोलत होते. कॉंग्रेसवर त्‍यांनी कडाडून टीका केली. कॉंग्रेसने सीबीआयचा गैरवापर केला. कोळसा घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाचे हात काळे झाले आहेत. कॉंग्रेसने जातीयवादाच्‍या नावाखाली देशाचे मुलभूत प्रश्‍न सोडविले नाही. देशावर संकट आले की धर्मनिरपेक्षता आणि जातीयवादाचा बुरखा कॉंग्रेसने कायम घेतला आहे, अशी टीका मोदींनी केली.

पुण्‍याला दहशतवाद्यांकडून सातत्‍याने का लक्ष्‍य करण्‍यात येत आहे, असा सवाल मोदींनी केला. दहशतवाद्यांच्‍या हितांसाठी देशाचा कायदा निर्माण व्‍हावा, यासाठीच महाराष्‍ट्र आणि केंद्र सरकार काम करत असल्‍याचा आरोप मोदींनी केला.

देशात वीजेचे संकट आहे. दररोज 20 हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्‍याची क्षमता असलेले प्रकल्‍प बंद पडले आहेत. सरकार असे काम करते का? प्रकल्‍प बंद कशामुळे आहेत? कोळसा नसल्‍यामुळे प्रकल्‍प बंद आहे. कोळशाच्‍या फाईलींवर पंतप्रधान बसले आहेत. त्‍यामुळे कोळसा उत्खनन बंद आहे, अशी टीका मोदींनी केली. अन्‍न सुरक्षा विधेयकासाठी कॉंग्रेसने एवढी घाई कशासाठी सुरु केली आहे, असा सवालही मोदींनी केला.

मोदींनी महाराष्‍ट्राच्‍या नेतृत्त्वावर टीका केली. ते म्‍हणाले, मी महाराष्‍ट्राला वीज देण्‍यास तयार होतो. परंतु, राज्‍यात असे सरकार आहे, की त्‍यांचे दिल्‍लीत काहीही चालत नाही, असे सांगून मोदींनी पृथ्‍वीराज चव्‍हाण यांना टोला लगावला.

सरदार सरोवर प्रकल्पाची उंची वाढविल्‍यास महाराष्‍ट्राला 400 कोटी रुपयांची वीज मोफत मिळेल, असा दावा मोदींनी केला. परंतु, त्‍यासाठी आवश्‍यक बैठक घेण्‍यास महाराष्‍ट्र सरकारने टाळाटाळ केली, असे मोदी म्‍हणाले.

कॉंग्रेसच्‍या आर्थिक धोरणांवरही मोदींनी टीका केली. ते म्‍हणाले, डॉलरच्या तुलनेत रुपया वारंवार घसरत आहे. त्याला सरकारचं धोरणच जबाबदार आहे. श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव, बांग्लादेशचे चलन स्थिर आहे. मग भारताचाच रुपया का घसरत आहे? असा सवाल मोदींनी केला.