आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात पार्टटाइम सरकार; नरेंद्र मोदींची काँग्रेसवर प्रखर टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/ नगर - आजच्या केंद्र व राज्य सरकारवर जनतेचा कोणत्याच बाबतीत विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रात तर पार्टटाइम सरकार आहे. आपली मुलगी शाळेतून वेळेवर आली नाही तर आई अस्वस्थ होते, अशी स्थिती आहे, अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी घणाघाती हल्ला चढवला. आजवर रिमोट कंट्रोलद्वारे सरकारे चालवली गेली, हे पाहिले होते. पण स्वत: रिमोटच सरकार कंट्रोल करत असल्याचा प्रकार सध्या सरकारकडे आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाची फाइल मंजुरीसाठी मॅडम सोनियांकडे जात असे, अशी माहिती स्वत: पंतप्रधानांनी नेमलेल्या अधिकार्‍यानेच पुस्तकात उघड केली. एवढे घडूनही मॅडम सोनिया, युवराज राहुल अद्याप मूग गिळून गप्प का आहेत, असा सवाल मोदी यांनी केला.

शिर्डी व पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांच्या शनिवारी सभा झाल्या. आपल्या तासाभराच्या भाषणात त्यांनी केंद्रातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाची खिल्ली उडवली.

मोदी म्हणाले, गेल्या दहा वर्षांतला प्रत्येक निर्णय सोनियांनी घेतला, असे या पुस्तकात आहे. आघाडी सरकारने दहा वर्षांत डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेची सातत्याने पायमल्ली केली. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार हे भारतीय घटनेने भारतीय नागरिकाला दिलेले अधिकार आहेत. पण काँग्रेसचे युवराज मात्र सारे आपणच केल्याचे भासवत आहेत. सरकारवर सकारात्मक अंकुश ठेवणार्‍या कॅग, सीव्हीसी, लष्कर.अशा अनेक यंत्रणा व संस्थांना सरकारविरोधात न्यायालयात धाव घ्यावी लागली, हे कशाचे लक्षण आहे, असा सवालही मोदी यांनी विचारला.

काँग्रेसचे युवराज सांगत फिरतात, अन्न नाही.कायदा केला, शिक्षण नाही, शिक्षक नाहीत. कायदा केलाय, शाळा नाहीत. कायदा केलाय, माहितीचा अधिकार. कायदा केलाय, आरक्षण.कायदा केलाय.या युवराजांना आता अँक्ट नको, अँक्शन हवी, असे ठणकावून सांगायची वेळ आहे. ती अँक्शन मतदार करतीलच, असे मोदी म्हणाले.

या मुद्यांवरही मोदी बोलले : 0 काळा पैसा आणून विकासासाठी वापरला पाहिजे 0गुजरात मोदी नव्हे, संस्थात्मक यंत्रणा चालवते 0संस्थांचे विकेंद्रीकरण हवे 0 नियोजन आयोगाला अँक्शन कौन्सिलची जोड हवी.

गंभीर चुका.. तरीही बक्षिसी
1. राष्ट्रकुल स्पर्धेप्रकरणी शीला दीक्षित यांच्यावर आरोप झाले. विक्रमी मतांनी त्या पराभूत झाल्या. लगेच त्यांना राज्यपालपद दिले.
2. देश अंधारात बुडाला, पण सुशीलकुमार शिंदे ऊर्जामंत्री होते. त्यांना गृहमंत्री केले.
3. एका अधिकार्‍याच्या पत्नीने स्वयंसेवी संस्थेच्या नावाखाली लाखो रुपयांचा अपहार केला, त्या अधिकार्‍याला थेट परराष्ट्रमंत्रिपदच दिले.
युवराजांना ठणकावून सांगा.. अँक्ट नको, अँक्शन हवी !