पुणे - घराणेशाहीचे वर्चस्व आणि पाटील-देशमुख या वतनदारांचा सोस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार यादीची वैशिष्ट्ये आहेत. एवढेच नव्हे तर मराठा जातीच्या सुमारे सव्वाशे जणांना उमेदवारी दिल्याने ‘मराठ्यांचा पक्ष’ हा राष्ट्रवादीवरील शिक्काही गडद झाला आहे.
‘राष्ट्रवादी’ने तब्बल ३० ‘पाटलां’ना, तर १२ ‘देशमुखां’ना यंदा विधानसभेची उमेदवारी दिली आहे. भुजबळ, पिचड, तटकरे, गावित, डावखरे, कलानी, नाईक, बेनके, पाटणकर, कुपेकर आदी १५ घराण्यांमधे वाटण्यात आलेल्या उमेदवारीमुळे पक्षावरील घराणेशाहीचे प्राबल्यही कायम राहिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी ५४ जागा अनुसूचित जाती व जमातींसाठी
राखीव आहेत. घटनेने बंधनकारक केलेले हे आरक्षित मतदारसंघ वगळता उर्वरित जागांपैकी ५३ टक्के जागांवर ‘राष्ट्रवादी’ने मराठा उमेदवार दिले आहेत.
३० ठिकाणी ‘पाटिलकी’
धुळे ग्रामीण (किरण), चोपडा (माधुरी), अमळनेर (साहेबराव), एरंडोल (डॉ. सतीश), जामनेर (दिगंबर), मुक्ताईनगर (अरुण), रिसोड (बाबाराव), नागपूर पश्चिम (प्रगती), औरंगाबाद मध्य (विनोद), गंगापूर (कृष्णा डोणगावकर), वैजापूर (भाऊसाहेब चिकटगावकर), कल्याण पश्चिम (संजय), कल्याण ग्रामीण (वंडारशेट), विक्रोळी (संजय दिना), वडाळा (प्रमोद), उरण (प्रशांत), आंबेगाव (दिलीप वळसे), नेवासा (शंकरराव गडाख), शेवगाव (चंद्रशेखर घुले) अहमदपूर (बाबासाहेब) निलंगा (बसवराज नगराळकर), उस्मानाबाद (राणा जगजितसिंह), वाई (मकरंद जाधव), कराड उत्तर (बाळासाहेब), राधानगरी (के. पी.), शाहुवाडी (बाबासाहेब आसुर्लेकर), शिरोळ (राजेंद्र यड्रावकर), सांगली (सुरेश), इस्लामपूर (जयंत) आणि तासगाव (आर. आर.) या ३० मतदारसंघांतले राष्ट्रवादीचे उमेदवार ‘पाटील’ आडनावाचे आहेत.
१२ मतदारसंघांत ‘देशमुखी’
काटोल (अनिल), चाळीसगाव (राजीव), अकोला पूर्व (विजय), अचलपूर (वसुधाताई), मोर्शी (हर्षवर्धन), वर्धा (सुरेश), रामटेक (डॉ. अमोल), हदगाव (प्रताप), भोकर (धर्मराज), नायगाव (श्रीनिवासराव), परभणी (प्रताप) आणि खानापूर (अमरसिंह) या बारा मतदारसंघांमध्ये ‘राष्ट्रवादी’ची वतने ‘देशमुखां’ना बहाल करण्यात आली आहेत.
प्रस्थापितांची सुभेदारी
प्रमुख नेत्यांनी पक्ष घरापुरता मर्यादित ठेवण्यात यश मिळवलेले असतानाच अनेक जागी प्रस्थापित नेत्यांची नवी फळी उदयाला आली आहे. अजित पवार (बारामती), आर. आर. पाटील (तासगाव), दिलीप वळसे-पाटील (अंबेगाव), जयंत पाटील (इस्लामपूर) सलग सहाव्यांदा रिंगणात उतरले आहेत. अनिल देशमुख (काटोल), बबनदादा शिंदे (माढा) पाचव्यांदा रिंगणात आहेत. मनोहर नाईक (पुसद), गडाख, घुले (नगर), भोसले (सातारा) ही प्रस्थापित घराणी आहेत.
घराणेशाही कायम
धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) आणि भाग्यश्री आत्राम (गडचिरोली), छगन भुजबळ (येवला) आणि पंकज भुजबळ (नांदगाव), गणेश नाईक (बेलापूर), संदीप नाईक (ऐरोली) असे एकाच घरातील उमेदवार राष्ट्रवादीने दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत (श्रीवर्धन), मधुकर पिचड यांचा मुलगा वैभव (अकोले), आमदार वल्लभ बेनके यांचा मुलगा अतुल (जुन्नर), पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह (उस्मानाबाद), विक्रमसिंह पाटणकर यांचा मुलगा सत्यजितसिंह (पाटण), लक्ष्मण जाधव यांचा मुलगा मकरंद (वाई), ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी (चंदगड) यादेखील रिंगणात आहेत.