आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या ‘अकरा जूनपर्यंत विषय संपवतो’ या वक्तव्याचे सावट सोमवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पुण्यातील वर्धापन दिनावरही पडले होते. पक्षाच्या सर्व मंत्र्यांच्या राजीनामे पवारांनी घेतल्याने कोण जाणार, कोण येणार याचीच चर्चा दिवसभर नेते व कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. त्यातच संध्याकाळचा नियोजित कार्यक्रम रद्द करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐनवेळी मुंबईकडे धाव घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.
पवारांचे होम पिच आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी आणि पुण्यात सोमवारी पक्षाच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पक्ष कार्यालयात चहापानाचाही कार्यक्रम होता. दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा होती ती फक्त मंगळवारच्या शपथविधीचीच.
सोमवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिरात अजित पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पवारांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना पवार यांनी ‘राष्ट्रवादी’च्या इतिहासाची उजळणी केली. मात्र त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमीचा जोष नव्हता. मुंबईमध्ये उद्या काय घडणार याची काळजी त्यांच्या स्वरात जाणवत होती. त्यानंतर पिंपरीमध्येही पवारांनी ज्येष्ठांच्या मेळाव्यात भाषण केले. या वेळी त्यांनी माझ्या कोणत्याही वक्तव्याचा विपर्यास केला जात असून विनाकारण माझी बदनामी केली जात असल्याची खंत व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.