पुणे - ‘अर्जुनाचे लक्ष जसे माशाच्या डोळ्यावर होते तसा मी फक्त स्वबळावर सत्ता आणण्याचाच विचार करतोय. निवडणुकीनंतरच्या आघाड्यांबद्दलचा विचारही माझ्या डोक्यात सध्या नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. एकाच पक्षाला बहुमत मिळावे ही माझी इच्छा आहे. लोक आमच्यापेक्षा शहाणे असतात. ते योग्य निर्णय घेतील,’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
निवडणुकीनंतर राष्ट्रवादी भाजप किंवा सेनेबरोबर जाणार असल्याच्या चर्चेवर पवार म्हणाले, ‘१९९९ मध्ये आम्ही स्वतंत्र लढलो तेव्हाही आमच्यावर हाच आरोप केला. आरोप करणाऱ्यांचे महाराष्ट्राबद्दलचे ज्ञान कमी दिसते,’ असा टोला त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला. प्रत्येक राजकीय पक्षाला जनमानसातील
आपले स्थान आजमावण्याची संधी मिळाली आहे. लोकांनीही ‘एकाच पक्षाचे सरकार स्थिर शासन देऊ शकते,’ हे महाराष्ट्रातले सूत्र पूर्ववत करावे हेच आवाहन मी सभांमधून करत आहे, असे ते म्हणाले.
राज यांना चिमटा :'राज ठाकरे यांचा मी आभारी आहे. भाजपचे धोरणसुद्धा ठरवण्याएवढा मी प्रभावशाली असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले याचा मला आनंद आहे,’ असा चिमटा पवारांनी काढला. भाजप - शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांचा हात असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.
पवार म्हणतात
* आमच्याच पक्षावर चोहोबाजूने हल्ला होतो, याचा अर्थ आम्ही शक्तिशाली आहोत, असा अर्थ मी काढतो.
* सिंचन घोटाळा हे प्रचारासाठी माजवलेले स्तोम आहे. एक टक्के सिंचन वाढ झाल्याचे राज्याच्या प्रमुखांचे विधान वास्तवाला धरुन नव्हते. सिंचनासाठी झालेल्या खर्चातून काहीच झाले नाही असे कसे म्हणता येईल. सभांमधून मी लोकांना हा प्रश्न विचारतो आणि त्यांच्या भागात झालेल्या कामांची माहिती देतो, तेव्हा त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो.