आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यसंमेलन सांगलीत; प्रयोग मात्र पुण्या-मुंबईतच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सांगली येथे 92 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 20 ते 22 जानेवारीदरम्यान होणार असले तरी ज्या रंगकर्मींना पाहण्यासाठी नाट्यरसिक आतुर असतात, असे अनेक कलाकार मात्र या काळात संमेलनाऐवजी ‘नाइट’चे हिशेब मांडत स्वत:च्या नाट्यप्रयोगात मश्गुल राहणार आहेत. त्यामुळे नाट्यसंमेलनातही नाट्यकलावंतांचीच वानवा असल्याची नामुष्की सांगली येथील संमेलनाच्याही भाळी अधोरेखित होणार आहे.
ज्या नाट्यप्रयोगांना भक्कम रकमेचे तिकीट घेऊन रसिक गर्दी करतात त्या सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरियम’चे सर्व प्रयोग संमेलनाच्याच तीन दिवसात मुंबईत महोत्सवरूपाने रसिकांसमोर येणार आहेत. रंगभूमीवरील अनेक आघाडीचे आणि लोकप्रिय कलावंत या नाटकांतून प्रमुख भूमिका साकारत असल्याने ते सारे संमेलनाला अनुपस्थित राहणार, हे उघड आहे.
सुयोग संस्थेच्या ‘केशवा माधवा’ या नाटकाचा प्रयोग 22 जानेवारीला पुण्यात आहे. मुंबईत देखील काही महत्त्वाच्या नाटकांचे प्रयोग शनिवार-रविवार असल्याने होणार आहेत. त्यामुळे नाट्यकर्मींना अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनापेक्षा स्वत:च्या नाट्यप्रयोगांविषयी अधिक आस्था असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक संमेलनाच्या काळात प्रयोग बंद ठेवण्याचा ठराव नाट्य परिषदेने या आधीच केला आहे. त्यामागील भावना लक्षात न घेता या ठरावाकडे दुर्लक्ष करत कलाकार प्रयोग रंगवणार असल्याने रसिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
‘प्रयोग बंद’चा ठराव
संमेलनाला कलावंत येत नाहीत, ही ओरड लक्षात घेऊन मच्छिंद्र कांबळी परिषदेचे अध्यक्ष असताना कलावंतांनी प्रयोग बंद ठेवून संमेलनास यावे, असा ठराव झाला होता. वर्षातील दोन दिवसही संमेलनासाठी देता येत नसतील, तर काय उपयोग? असा सवालही करण्यात आला होता.
सक्ती करता येत नाही
सर्व रंगकर्मींनी अधिकाधिक संख्येने नाट्यसंमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन आम्ही परिषदेतर्फे वारंवार केले आहे आणि अजूनही करत आहोत. नाट्यसंमेलन हे रसिकांप्रमाणेच नाट्यकर्मींचे एकत्र येण्याचे ठिकाण असावे. त्यांच्यात चर्चा, संवाद घडावा, एकमेकांच्या समस्यांविषयी बोलणे घडावे, एकत्रित मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा हा उद्देश आहे. पण कुणावरही सक्ती करता येत नाही, हेही स्पष्ट आहे. कारण शेवटी हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक इच्छेचा प्रश्न आहे. संमेलन अधिकाधिक रंगकर्मीभिमुख व्हावे हाच प्रयत्न आहे.’
हेमंत टकले, अध्यक्ष, नाट्य परिषद (मध्यवर्ती शाखा)