आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उकडीचे मोदक, श्रीखंडपुरीचा बेत, नाट्यरसिकांना वैविध्यपूर्ण मेजवाणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संमेलनाच्या निमित्ताने रसिकांना साहित्यिक, वैचारिक मेजवानी मिळत असली तरी रसिकांच्या जिव्हा तृप्त करणारी षड्रसांची मेजवानीही या वर्षीच्या नाट्यरसिकांना सांगलीकर मंडळी खिलवणार आहेत. मुख्य म्हणजे एकही पदार्थ रिपिट न करण्याची काळजी या वेळी घेण्यात आली आहे.
संमेलनाचे कार्यवाह शफी नायकवडी यांनी ‘दिव्य मराठी’ला नाट्यसंमेलनातील मेन्यूंची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी नाश्त्याला डोसा, भाजी, चणी आणि सांबार, शनिवारी सकाळी इडली, वडा तर रविवारी सकाळी मिसळ-पाव असा बेत ठरवण्यात आला आहे.
दुपारच्या भोजनात शुक्रवारी पुरणपोळी, कांदाभजी, कटाची आमटी, सांडगे, चपाती, भाताचा आस्वाद घेता येईल. शनिवारी दुपारी उकडीचे मोदक, मुगाची उसळ, मिक्स भाजी, पुलाव, सॅलड यांची मेजवानी असेल. रविवारी दुपारी गव्हाची खीर, मुगाची भजी, भेंडी फ्राय, मसालाभात, आमटी, ताक, कोशिंबीर असे वैविध्य असेल, असे नायकवडी म्हणाले.

भाकरी अन् कांदाही
रात्रीच्या जेवणाचा थाट सांगताना ते म्हणाले, शुक्रवारी रात्री श्रीखंड पुरीचा बेत असून सोबतीला दमआलू, भरलेला दोडका, कढी असेल. शनिवारी रात्री बासुंदी, बटाटेवडा, आलूमटर, कोकणी खिचडीची चव चाखता येईल. रविवारी रात्री डॉलर जिलबी, थालीपीठ, लोणी, दही, खर्डा चटणी, मटकीची उसळ, बाजरीची भाकरी आणि कांदा रायता असे पदार्थ नाट्यरसिकांची जिव्हा तृप्त करतील. दरम्यान, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटकांसह अनेक मान्यवरांचे शुक्रवारी नाट्यपंढरीत आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने सांगली शहरातील वातावरण चैतन्यमय झाले असल्याचे संयोजन समितीतर्फे सांगण्यात आले.

अशीही प्रेमाची भेट
नाट्यसंमेलनासाठी सांगलीला भेट देणाºया प्रतिनिधींना सांगलीकर एक खास प्रेमभेट देणार आहेत. सांगलीची प्रसिद्ध हळद (हळकुंड), गूळाची छोटी ढेप, भडंग आणि बेदाणे यांचा एक सुंदर पॅक या संमेलनाची आठवण म्हणून देण्यात येणार आहे, असेही शफी नायकवडी यांनी सांगितले.