आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखान्यांनी सर्व शक्ती पणाला लावून दुष्काळावर मात करावी; पवारांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांनी सामूहिक शक्ती पणाला लावावी. केंद्र आणि राज्य सरकार मदत करत आहेत. आपणही मदतीचा हात पुढे केला पाहिजे,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा वसंतदादा साखर संस्थेचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिला. प्रत्येक कारखान्याने दुष्काळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि चारा छावण्यांसाठी काही ना काही रक्कम बाजूला काढावी, असेही त्यांनी सुचवले.

‘व्हीएसआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपाध्यक्ष शिवाजीराव गिरिधर पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, माजी मंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह राज्यातल्या अनेक कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी या वेळी उपस्थित होते. ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर कारखान्यांची स्थिती बरी आहे. साखरेचे दर २१०० रुपयांवरून २९०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. मात्र राज्यावर दुष्काळाचे संकट आहे. संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्रितपणे विचार केला पाहिजे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही यासाठी कारखान्यांनी निर्णय घ्यावा. आपल्यापेक्षाही जो अधिक दुबळा आहे त्याची आठवण ठेवली पाहिजे. त्याचे विस्मरण झाले तर सहकार चळवळीमागच्या मूळ विचारधारेपासून बाजूला गेल्यासारखे होईल,’ असे पवार म्हणाले. प्रत्येक कारखान्याने काही ना काही रक्कम बाजूला काढावी. याचा उपयोग सहकारी चळवळीत नसलेल्या उपेक्षित माणसाला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राज्याचे जे धोरण असेल त्याला कारखान्यांनी हातभार लावावा, अशी सूचनाही पवारांनी केली.

‘राज्यातल्या दुष्काळासंदर्भात पवारांनी वारंवार भेट घेऊन मोलाचे सल्ले दिले. त्यांचे अनुभव त्यांनी मला सांगितले, हे आवर्जून सांगितले पाहिजे. त्यांच्या काही सूचनांचा अवलंब आम्ही करत आहोत,’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ऊस उत्पादनात अव्वल कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि दर्जेदार कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पाण्यावरून संघर्ष नको
‘नाशिक-औरंगाबाद, पुणे-सोलापूर, सोलापूर-लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी वाद सुरू झाले अाहेत. आपले भाऊबंद पाण्यासाठी तडफडत असताना आपण विरोध करणार असू तर ते मानवतेच्या दृष्टीने बरोबर ठरणार नाही. पाण्यावरून संघर्ष होणार नाही याचा आदर्श दाखवून द्या. राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवा,’ असे अावाहनही पवार यांनी केले.