पुणे- संकटात सापडलेल्या खासगी, राष्ट्रीयीकृत बँकांना केंद्र सरकार हजारो कोटी रुपयांची मदत करत असताना हाच दृष्टिकोन सहकारी बँकांबाबत ठेवला जात नाही. या संदर्भातले धोरण भारतीय रिझर्व्ह बँकेने बदलावे यासाठी आपण लढा देणार असून यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी वर्षारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
पवार म्हणाले की, सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. चुकीच्या गोष्टींचे समर्थन मी करणार नाही. मात्र, गरीब माणसाला राष्ट्रीयीकृत बँकेत सहजरीत्या कर्ज मिळत नाही. लंगोटी घालून गेलेल्या एखाद्या आदिवासी, शेतकऱ्याला तिष्ठत बसावे लागते. पण टाय बांधून गेलेल्या माणसाची त्याच बँकेत लगेच चौकशी केली जाते. त्यामुळे गरीब माणसाला उभे करण्यासाठी सहकाराला ताकद दिली गेली पाहिजे. शेतमालाच्या किमती दिवसेंदिवस कमी होत आहेत. शेतकरी जगला नाही तर परदेशातून आयात वाढवावी लागेल. मात्र, याच शेतकऱ्याच्या उत्पादनाला रास्त किंमत आणि विक्री व्यवस्था उपलब्ध करून दिली तर तो देशाची भूक भागविण्यास समर्थ ठरतो, असेही ते म्हणाले.
ऑक्टोबर महिन्यात साखर कारखान्यांकडे त्यांच्या उत्पादनाच्या २७ टक्क्यांपेक्षा अधिक साखर शिल्लक असता कामा नये, या केंद्राच्या आदेशाबद्दल पवारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
‘सहकारी बँका चालवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहेत, तरीही भविष्यात बँकेच्या ठेवी दहा हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. कर्ज पुरवठ्याचा पल्लादेखील हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे,’ असे अजित पवार यांनी सांगितले. काम करताना जिल्हा बँकेचा आत्मा असणाऱ्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी सहकार विभागाने व्यवहार्य मार्ग काढला पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. सहकारमंत्री देशमुख सुभाष यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
पीककर्ज मुदतीत फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून शून्य टक्के व्याज
राज्यात३१ जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत. यापैकी सातारा आणि सांगली वगळता विदर्भ-मराठवाड्यातील सर्व बँकांचा मिळून जितका नफा होतो त्यापेक्षा जास्त नफा एकट्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कमावला आहे. तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज मुदतीत फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून शून्य टक्के व्याज आकारणी केली जाते. आमच्या बँकेचे क्रेडिट कार्ड आज देशातल्या कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये चालते. यंदा सहा हजार कोटींचे कर्जवाटप केले. बँकेचे खेळते भांडवल १०२८ कोटी आहे. स्वनिधी हजार १६७ कोटींचा आणि बँकेच्या ठेवी हजार ६०० कोटींच्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.