आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंतरावांच्या सभ्यपणामुळे महाराष्ट्राचे पंतप्रधानपद हुकले- शरद पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा-तुकाराम नगरी (पिंपरी) - 'महाराष्ट्राचेपहिले मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांचा सभ्य आणि सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला मिळू शकणाऱ्या पंतप्रधानपदाच्या आड आला,' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केला. पिंपरी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत पवारांनी अनेक मुद्द्यांवर मते मांडली.
काँग्रेस नेते उल्हास पवार, माजी संमेलनाध्यक्ष कवी फ. मुं. शिंदे आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी पवारांशी संवाद साधला. मात्र, त्यांना बोलते करणारे प्रश्न विचारण्याऐवजी मुलाखतकार मंडळींनी पवारांचे गुणगान गाण्यात अधिक वेळ दवडला. त्यामुळे पवारांपेक्षाही तीन मुलाखतकारांची स्वगते ऐकण्याचीच पाळी श्रोत्यांवर आली. रविवारची सकाळ असूनही संमेलनाला उपस्थित असणारी रसिकांची गर्दी आयोजकांचा उत्साह वाढवणारी ठरली. 'पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले तेव्हा यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षणमंत्री होते. शास्त्रीजींनंतर पंतप्रधानपदी चव्हाणांचीच निवड व्हावी, असे काँग्रेस समितीने ठरवले. मात्र, त्या वेळी चव्हाण यांनी 'पंडित नेहरूंनी मला दिल्लीच्या राजकारणात आणले. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातही इंदिरा गांधी यांनी मला मदत केली आहे. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही,' असे सांगत सभ्यपणा दाखवला. चव्हाण साहेबांच्या या निर्णयाला त्या वेळी मी विरोध दर्शवला होता, मात्र ते माझ्यावरच रागावले. गांधींना भेटून घरी परतल्यानंतर आम्ही चव्हाण यांना 'काय झाले?' असे विचारले. तेव्हा गांधींनी विचार करण्यासाठी सहा तासांचा अवधी मागून घेतल्याचे चव्हाणांनी सांगितले. त्याही वेळी मी म्हणालो की 'काही वेळातच गांधींचा निरोप येईल आणि त्या स्वतःच पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त करतील.' मात्र, माझ्या या वक्तव्यावरही चव्हाण रागावले. तेवढ्यात गांधींचा फोन आला. माझ्या पंतप्रधानपदाला तुमचा पाठिंबा आहे, असे मी गृहीत धरत असल्याचे गांधी यांनी फोनवरूनच चव्हाणांना सांगितले,' अशी आठवण पवारांनी सांगितली. 'आणि चव्हाण यांचा हाच सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या पंतप्रधानपदाच्या आड आला,' असे पवार म्हणाले.
संमेलनाध्यक्षांनापाच लाख :
८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अंदमान येथील विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे आणि ८९ व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. पवारांच्या हस्ते या सर्वांना धनादेश प्रदान करण्यात आला.
'वेगळा विदर्भ नको'
- मातृभाषक शाळांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. मराठी विषय सक्तीचा करण्याबाबत तडजोड करून चालणार नाही. अल्पसंख्याकांच्या भाषाहिताची जपणूक करण्यासाठी काही लोक वेगळ्या पद्धतीने लाभ घेतात, अशावेळी सक्ती हवीच.
- वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे प्रामुख्याने अमराठी आहेत. तेथील सामान्य लोकांना वेगळा विदर्भ नकोय. राजकीय स्वार्थापोटी काही लोक ही मागणी करत आहेत. ऐक्य आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकीय भूमिका बाजूला ठेवून या मुद्द्यावर एकत्र यावे.
'संपादक' पवार
'शशी शेखर वेदक हे बाळासाहेब ठाकरेंचे माझे इंग्लंडमधील मित्र. टाइम मासिकाच्या धर्तीवर मराठी मासिक सुरू करण्याची कल्पना त्यांनी मांडली. मी, बाळासाहेब, वेदक आणि बा. कृ. देसाई यांनी प्रत्येकी पाच हजारांचे भांडवल टाकून तयारी केली. आम्हा चौघांचे संपादक मंडळ केले. बाळासाहेबांच्या हितचिंतकाने सांगितले की पहिला अंक सिद्धविनायकाच्या चरणी ठेवलात तर अंक बाजारात 'दिसणार' नाही. आम्ही त्यांचे ऐकले आणि अंक पुन्हा कधीच बाजारात दिसला नाही,' हा किस्सा शरद पवारांनी ऐकवला तेव्हा प्रचंड हशा पिकला.