आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यात राष्ट्रवादी \'डेंजर झोन\'मध्ये, विजयदादांविरोधात प्रतापसिंहाची बंडखोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 5 जागा मिळतील असे एबीपी न्यूज-नेलसन सर्वेचा अंदाज आला असताना राष्ट्रवादीची डोकेदुखी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याविरोधात त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी केलेली बंडखोरी कायम ठेवली आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी (दुपारी तीनपर्यत मुदत) प्रतापसिंह यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता दोघांत लढत होणार आहे. त्यामुळे माढ्यातील राष्ट्रवादीची जागा धोक्यात आल्याचे मानण्यात येत आहे.
प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी माढ्याचे खासदार शरद पवारांनी कोणतेही विशेष काम केले नसल्याचे सांगत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र, थोरले बंधू विजयसिंह त्यांना समजावतील व प्रतापसिंह आपल्या बंधूसाठी निवडणुकीतून माघार घेतील असेही सांगितले जात होते. मात्र, ती केवळ चर्चाच राहिली. याबाबत माढयात अशीही चर्चा होती की, विजयसिंहांनी आपले पुत्र धवल याला राजकीय वर्तुळात कोठेतरी स्थान द्यावे अशी प्रतापसिंहांची इच्छा होती. मात्र, विजयसिंह मागील विधानसभेत पराभूत झाल्यापासून राजकीय विजनवासात होते. अशा परिस्थितीत मोहिते-पाटील यांच्या घरात भाऊबंदकी सुरु झाली. त्यामुळे प्रतापसिंहांनी थेट लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादी तसेच विजयसिंह अडचणीत आले आहेत.
विजयसिंहांना लोकसभेसाठी विजय अत्यंत आवश्यक आहे. 2009 साली विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र विरोधकांनी ऊसावरून थेट पवारांवरच हल्लाबोल केला आहे. ऊस दर शेतक-यांत गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी दर दिल्याने प्रचंड नाराजी व खदखद आहे. माढ्यात धनगर समाज मोठा आहे. मुंडेंनी या समाजातील नेत्याला महायुतीत घेतल्याने सदाभाऊ खोत यांना या समाजाची एकगठ्ठा मते मिळणार आहेत. राष्ट्रवादीला याचा फटका बसण्याची जास्त शक्यता असतानाच प्रतापसिंहांनी आता विजयदादांची डोकेदुखी वाढवली आहे. विजयदादांना पक्षातंर्गत विरोध आधीच मोठा आहे. 'एक और धक्का दो, फिर आप ही राज करो' असा प्रचार राष्ट्रवादीतीलच काही जण विजयदादांविरोधात करीत आहेत. गेल्या वेळीस पवार लढले असतानाही विरोधकांनी साडेतीन लाखांच्या आसपास मते खाल्ली होती. पवारांना 5 लाख 30 हजार मते पडली होती. आता प्रतापसिंहांनी लाखभर मते खाल्यास व पक्षातंर्गत विरोधकांनी मदत न केल्यास विजयदादा डेंजर झोन येतील असे बोलले जात आहे. आमदार बबन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांनी शरद पवारांना विजयदादांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. अशा स्थितीत माढ्यातील फाईट संघर्षाची व अटीतटीची होणार आहे.