आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप वळसे पाटील मंचावरच कोसळले, हृदयविकाराचा सौम्य झटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील यांना रविवारी दुपारी एका कार्यक्रमात हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे व्यासपीठावरच कोसळले. सध्या वळसे यांची प्रकृती स्थिर असून पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील 48 तास त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे जिल्हा दूध संघातर्फे ‘कात्रज डेअरी एक्स्पो’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करतानाच वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यामुळे ते व्यासपीठावर कोसळले. कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. त्यांनी आणि पक्षाच्या इतर पदाधिकार्‍यांनी वळसे-पाटील यांना त्वरित नजीकच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वळसे-पाटील यांच्या हृदयात पेसमेकर बसविले आहे. पेसमेकरमुळे हृदयाचे ठोके नियंत्रित होत असतात. मात्र, रविवारी दुपारी कार्यक्रमादरम्यान पेसमेकरमध्ये बिघाड होऊन हृदयाचे ठोके कमी-जास्त झाल्याने वळसे-पाटील यांना हा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
रूग्णालयात तत्काळ दाखल करण्यासाठी 'ग्रीन कॉरिडॉर'
दिलीप वळसे-पाटील यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमधून रुबी हॉलमध्ये हलविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर केला. त्यामुळे 10 किलोमीटरचे अंतर अवघ्या 14 मिनिटात पार करून वळसे-पाटील यांच्यावर रुबीमध्ये उपचार करणे शक्य झाले.
बातम्या आणखी आहेत...