आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मांजर’वाद : खासदारांनी ठाेकला ५ काेटींचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी शेजाऱ्याविरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. चव्हाण व त्यांच्या जावेने मांजर मारल्याची तक्रार या शेजाऱ्याने न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याची तक्रार खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन केली. शेजार घरातल्या पाळीव मांजरांमुळे सुरू झालेली भांडणे स्वत: वकील असणाऱ्या चव्हाण यांनीही कोर्टाच्या पायरीवर नेली आहेत.

सदाशिव पेठेतील यशोधन अपार्टमेंटमध्ये चव्हाण राहतात. या ठिकाणी विजय नावडीकर यांनी पाळलेल्या ७ ते ८ मांजरांमुळे उपद्रव होत असल्याची तक्रार चव्हाण यांनी सन २०१२ मध्ये महापालिकेकडे केली. ‘संपूर्ण इमारतीत मांजरांचा वावर असतो. जिन्यात, टेरेसवर, गार्डनमध्ये आणि इमारतीच्या आवारात ही मांजरे घाण करतात. रात्री-अपरात्री आवाज करतात. त्यामुळे इमारतीतील सर्व रहिवाशांना त्रास होतो व आरोग्यासही विघातक परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

खासदारानेच तक्रार केल्याने या अर्जाची दखल महापालिकेने तातडीने घेतली. अधिकाऱ्यांनी यशोधन सोसायटीची पाहणी करून नावडीकर यांना नोटीस बजावली. मांजरींची संख्या मर्यादित ठेवावी तसेच त्यांच्या मलमूत्राचा त्रास सोसायटीतील रहिवाशांना न होऊ देण्याची दक्षता घ्यावी अन्यथा महापालिका कारवाई करेल, असे नोटिशीत बजावण्यात आले. मात्र सदर मांजरे आपली नसल्याचे सांगत नावडीकरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सन २०१४ मध्ये सर्व सदनिकाधारकांनी मांजरांच्या उपद्रवासंबंधीची दुसरी तक्रार केली. शासनाच्या ‘अॅनिमल वेल्फेअर ऑफिसर’तर्फे कायदेशीर कारवाई करण्याची सूचना चव्हाण यांनी केली. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी सोसायटीला भेट दिली.

सदनिकाधारकांच्या तक्रारी व अॅनिमल वेल्फेअर अधिकाऱ्यांचे अहवाल आल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनीही भेट दिली. सर्व मांजरे सात दिवसांच्या आत सदाशिव पेठ परिसरातून बाहेर काढावीत अगर उपद्रव होणार नाही अशा तऱ्हेने व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांनी या आदेशाविरोधात नावडीकर यांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात आढावा अर्ज दाखल केला आहे. तूर्तास तो प्रलंबित आहे. खटल्याची प्रोसेस इश्यू झाल्यानंतर नावडीकरांनी माध्यमांना बदनामिकारक बातम्या दिल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...