आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Leater Sharad Pawar Comment On PM Narendra Modi For FDI Issue

‘एफडीआय’ वाढल्यास देशाचे तुकडे पडतील; पवारांनी मोदींवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- ‘देशातील अनेक क्षेत्रांत थेट परकीय गुंतवणुकीसाठी दारे उघडी करणाऱ्या मोदी सरकारच्या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या देशातील वातावरण बाहेरील गुंतवणुकीला पोषक नाही.

सोव्हिएत रशियाचे पंतप्रधान गोर्बार्चेव्ह यांनी कम्युनिस्ट तत्त्वे बाजूला ठेवून आपल्या देशाला ताकदवान बनवण्याच्या नादात अर्थव्यवस्था खुली केल्याने भांडवलदारांची मुजोरी वाढून पुढे या देशाचे दहा तुकडे झाले. आपल्या सरकारनेही तसेच निर्णय घेतल्यास आपल्या देशाचीही तीच गत होईल,’ अशी भीती पवारांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता व्यक्त केली.

बारामती व्यापारी महासंघातर्फे अायाेजित कार्यक्रमात पवार बाेलत हाेते. ‘पूर्वी साेव्हिएत रशियातील वस्तूंच्या किमती सरकार ठरवत असे. मात्र तेथील सरकारनेच ‘बाजार ठरवेल तीच किंमत’ असे धाेरण स्वीकारल्याने प्रचंड महागाई वाढली. एका वर्षात सोव्हिएत रशियाचे तुकडे होऊन पंतप्रधान गोर्बाचेव्ह यांची सत्ता गेली. त्याउलट चीनने डाव्या विचारसरणीची चौकट न सोडता उद्योगवाढीला चालना दिली. अाज भारतात रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला दरवाजे सताड उघडे केल्याने चिनी कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या राज्यकर्त्यांनी रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे.’

मंदीतून बाहेर पडण्यासाठी एफडीअायचा निर्णय घेतला असला तरी त्यामुळे दुकानदारीवर अवलंबून असणारी कुटुंबे संकटात सापडल्याशिवाय राहणार नाहीत,’ याकडेही पवारांनी माेदी सरकारचे लक्ष वेधले.

देशात गुंतवणुकीला प्रेरणा नाही
‘निवडणुकीअगोदर भाजपने अापण व्यापार-उदिमाचे पुरस्कर्ते असल्याची भूमिका मांडली हाेती. कृषी क्षेत्रातील आर्थिक उत्साहाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असताे. मात्र आपल्या देशात शेतीमालाच्या पडत्या बाजारभावामुळे कृषी क्षेत्रात गुंतवणुकीत उत्साह नाही. त्यातच शेतकऱ्यांची क्रयशक्ती घटल्याने बाजारात मंदी आहे. गुंतवणुकीला प्रेरणा देणारी सरकारची दिशा नाही. म्हणूनच शेती क्षेत्राबरोबर उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीलाही नैराश्याने ग्रासले आहे. गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारकडून निर्णय हाेत नाहीत. त्यामुळे वाहन खरेदीत घट व साेन्याची खरेदीही ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे पवार म्हणाले.

जेटलींची भूमिका दुटप्पी : पवार
‘भारताचा विकसित राष्ट्र म्हणून उदय होण्यासाठी बारामतीप्रमाणे शंभर शहरे उभारावी लागतील,’ अशा शब्दांत बारामतीत येऊन शरद पवारांचे काैतुक करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही पवारांनी टीका केली. ‘विरोधी पक्षात असताना व्यापाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील रामलीला मैदानावर अांदाेलन करून रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला विराेध केला हाेता. अाता याच जेटलींचे सरकार ४९ टक्के रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला दारे उघडत अाहे,’ असा टाेलाही पवारांनी लगावला.

...तर देशात बेराेजगारी वाढेल
देशातील व्यापाऱ्यांसमाेर ई-काॅमर्सचे अाव्हान असताना रिटेल क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीमुळे छोट्या-मोठ्या व्यापारावर वाईट परिणाम होतील. इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीच्या व्यवसायात जगातील बड्या कंपन्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे किरकाेळ विक्रेत्यांचे व्यवसाय चालतील का? जगात अनेक देशांत दुकानदारी पद्धत बंद पडली आहे. त्यानुसार अापल्याही देशातील किरकाेळ व्यवसाय बंद पडून बेराेजगारी व दारिद्र्य वाढेल, अशी भीतीही पवारांनी व्यक्त केली.