आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदार दोघे, पण उत्तर काँग्रेसने द्यावे! पवारांबरोबरील बैठकीत रंगली खलबते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्य विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची तातडीची बैठक रविवारी पुण्यात झाली. पाऊसपाणी, दुष्काळाची माहिती साहेबांनी घेतली, असे गृहमंत्री आर.आर. पाटील बैठकीनंतर म्हणाले, तर विधान परिषदेच्या उमेदवारांची चर्चा झाल्याचे बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तथापि, अधिवेशनात विरोधकांकडून होणाºया टीकेचा भडिमार काँग्रेसकडे वळवण्याची रणनीती या बैठकीत निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडी सरकार म्हणून काही मुद्द्यांवर जबाबदारी सामूहिक असली तरी, उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवण्याचा पवित्राही ठरवण्यात आला आहे.
वसंतदादा साखर संस्थेच्या नियमित बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आले होते. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, आर.आर. पाटील, सुनील तटकरे, अनिल देशमुख आदी मंत्र्यांसोबत सल्लामसलत केली. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड व प्रफुल्ल पटेलही या बैठकीस उपस्थित होते. अधिवेशनात ‘राष्ट्रवादी’ला अडचणीत आणू शकणाºया मुद्द्यांचा आढावा पवारांनी घेतला.
विधान परिषदेच्या जागा 3, अर्ज 70 - विधान परिषद उमेदवारांची चाचपणी पवार यांनी केली. ‘विधान परिषदेच्या तीन जागांसाठी सत्तर इच्छुकांचे अर्ज आले आहेत. अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील,’ असे भुजबळ यांनी सांगितले. बैठकीपुर्वी प. महाराष्ट्रातील आमदारांनी जोरदार ‘लॉबिंग’ केले. अजित पवार यांच्या पसंतीच्या तीन नावांवरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
शरद पवारांची नाराजी- गृह, अर्थ, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्यांच्या कामगिरीवर काही महिन्यांत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. गुलाबराव देवकर, सुनील तटकरे या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. माध्यमांमधून त्यावर सातत्याने चर्चा होते आहे. पक्षाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होत असल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली. तटकरे यांची जाहीरपणे पाठराखण केली असली तरी त्यांनी माध्यमांपासून दूर राहावे, अशी सूचनाही करण्यात आली.
अशी लागली ‘फील्डिंग’- सिंचन आकडेवारीतील घोळ, कातिल सिद्दिकीचा कारागृहात खून, पाणीपुरवठा, दुष्काळी स्थिती या मुद्द्यांवर
‘राष्ट्रवादी’ मंत्र्यांना धारेवर धरण्याची विरोधकांची तयारी आहे. टोलनाक्याच्या मुद्द्यावर भुजबळ टार्गेट होण्याची शक्यता आहे. असे असतानाही ‘आदर्श’, मंत्रालय आग व भ्रूणहत्येच्या मुद्द्यावर तोफा काँग्रेसकडे वळवण्याची ‘फील्डिंग’ लावण्याचे ठरले आहे. मंत्रालय आगीची जबाबदारी सामूहिक असल्याचे सांगतानाच उत्तरासाठी मात्र मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले जाणार आहे. मुख्यमंत्री जलद निर्णय घेत नसल्याचे रेटून सांगण्याची सूचनाही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्रालय आगीची जबाबदारी सामूहिक - उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण