आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीसाठी अजित पवार गैरहजर का? उदयनराजेंचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यात घडलेल्या सिंचन घोटाळ्यात आरोपी असूनही तसेच एसीबीने चौकशीसाठी समन्यस बजावलेले असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पथकासमोर अनुपस्थित राहिले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली. घोटाळे करणाऱ्यांनी स्वत: उपस्थित न राहता वकिलांना पाठवले, हे योग्य नाही. त्यांनी चौकशी आयोगापुढे स्वत: उपस्थित राहून आपली बाजू मांडायला हवी होती, अशा शब्दांत उदयनराजेंनी पवारांना टीकेचे लक्ष्य बनवले. दुष्काळप्रश्नी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी टीका केली. राज्यात पाणी प्रश्नाचे राजकारण झाल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. आजवरचे घोषित सिंचन प्रकल्प पूर्ण केले असते, तर सध्याइतकी भीषण परिस्थिती उद्भवली नसती, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांना लगावला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘दुष्काळ’ या संकल्पनेचा कायदेशीर भाषेत व न्यायालयीन प्रक्रियेत वगळण्यात आलेला अर्थ त्वरित समाविष्ट करण्यात यावा, अशी आग्रही मागणीही भोसले यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयाचा हवाला देऊन भोसले म्हणाले,“ १९५८ च्या दुरुस्तीनुसार राज्य शासनाने ‘दुष्काळ’ (फॅमिन) हा शब्द वगळून तेथे ‘तुटवडा, अभाव’ या अर्थाचा ‘स्केर्सिटी’ हा शब्द घातला आहे. त्या सर्व ठिकाणी ‘दुष्काळ’ असाच शब्द पुन्हा घालण्यात यावा, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र देणार आहोत, असेही उदयन राजेंनी स्पष्ट केले.
उदयनराजेंच्या इतर मागण्या
पूर्णवेळ शेतकऱ्यांना मनरेगा सामावून मजुरीचे पैसे थेट बँकखात्यात जमा करावेत
दुष्काळी भागातील सर्व विहिरी, बोअरभोवती गोलाकार पुनर्भरण गॅलरीज कराव्यात
शेततळी, धरणांतील गाळ काढून सिंचन क्षमता वाढवावी
सीएसआर अंतर्गत उद्योगांना दुष्काळी भागातील काही जबाबदारी सोपवावी
इर्मा (इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन अग्रिकल्चर) कायदा करावा
शेतकऱ्यांना १५ हजारांचे बिनव्याजी कर्ज द्या
या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे यांनी राज्यांत सरकारने ताबडतोब दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ हजार रूपये बिनव्याजी कर्ज द्यावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आणि शेती संलग्न व्यवसायाचे कर्ज माफ करावे, अशी मागणी उदयनराजेंनी केली.