बारामती- ‘कृषी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्तेबद्दल प्रश्चचिन्ह उपस्थित करून भारतीय कृषी संशोधन संस्थेने कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली हाेती. मात्र, गुणवत्ता व दर्जाबाबत तडजोड न करता संबंधित महाविद्यालयांना सुधारण्याची एक संधी द्यावी. तरीही सुधारणा हाेत नसेल तर अशी कृषी महाविद्यालये बंद करावीत,’ अशी सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साेमवारी केली.
देशाची भूक भागवण्यासाठी अावश्यक असलेल्या जनुकीय बदलावर आधारित नवीन वाणाच्या संशोधनावर बंदी घातल्यामुळे कृषी संशोधन प्रक्रिया ठप्प झाल्याचा अाराेपही त्यांनी केला.
अमेरिका, ब्राझील, कॅनडातून आयात केलेल्या बीटी सोयाबीनपासून तयार खाद्यतेल भारतातील बहुसंख्य लोक खातात. मात्र, भारतात बीटी सोयाबीन उत्पादनावर बंदी आहे. खाद्यतेल आयातीतून इतर देशाला पैसा जाण्यास न्यायालयाचा व तज्ज्ञांचा पाठिंबा आहे. मात्र, नवीन पीक जातीची ट्रायल घेण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील संशोधन ठप्प झाले आहे. शास्त्रज्ञही निराश झाले आहेत याकडेही पवारांनी लक्ष वेधले.