आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP State President Bhaskar Jadhav News In Marathi , Uddhav Thackeray, Pune

उद्धव उत्तर द्या, तुम्ही गुंड की षंढ? भास्कर जाधव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समाजासाठी काम करणारा गुंडा पुत्र अपेक्षित होता. पण उद्धव काहीही करत नाहीत. ते गुंड आहेत की षंढ याचे उत्तर त्यांनीच आधी महाराष्ट्रला द्यावे,’ अशी बोचरी टीका करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शुक्रवारी नवा वाद निर्माण केला.

उद्धव ठाकरे नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ‘टग्या’ असा करतात, याबद्दल जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या खांद्यावर शिवसेनेचा झेंडा.’ त्यांना त्यांचा पुत्र या पद्धतीचा गुंडा अपेक्षित होता. उद्धव यांनी आमच्या नेत्यांवर टीका करण्यापूर्वी स्वत: कोण आहे ते सांगावे, हा माझा जाहीर सवाल आहे.’ मावळ लोकसभा मतदारसंघातील थेरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार या वेळी उपस्थित होते.

मावळमधून मीच उमेदवार बरा
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर जाधव यांना विनोद करण्याची लहर आली. मावळमधून माझ्यापेक्षा चांगला उमेदवार तुम्हाला मिळणार नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘मावळ मतदारसंघातले तीन तालुके आमच्या कोकणातील रायगड जिल्ह्यातले आहेत. रायगडमध्ये पक्षाची ताकद चांगली आहे. सुनील तटकरे हे रायगडमधलेच असल्याने त्यांचीही मला चांगलीच मदत मिळेल.’ जाधव आणि तटकरे यांच्यातून विस्तव जात नसल्याची माहिती ‘राष्ट्रवादी’ कार्यकर्त्यांना असल्याने जाधवांच्या या विधानानंतर हशा पिकला. ‘माझ्या उमेदवारीसाठी मोठ्या साहेबांकडे वशिला लावावा,’ असा लटका आग्रह त्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांकडे धरला.

उमेदवार मिळेना, जाधव यांचे उसने अवसान
आझम पानसरे यांच्यापाठोपाठ आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीला टांग मारल्यापासून ‘राष्ट्रवादी’च्या तिकिटावर मावळ लोकसभा लढवणारा उमेदवार मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच जाधव यांनी उसने अवसान आणून केलेले भाषण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पसंत पडले नाही. जाधव यांनी बाकीची बडबड करण्याऐवजी थेट उमेदवार कोण, याबाबत सांगितले असते तर कार्यकर्ते कामाला लागले असते. आजच्या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर झाला नाही, असे मत कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केले.