पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जात नसल्याचे कारण देऊन वाणी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मूळचे भाजपचे व संघाचे कार्यकर्ते असलेले वाणी यांनी केंद्रात मोदींची व राज्यात महायुतीची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागताच पवारांपासून फारकत घेतली आहे. वाणी हे अजित पवारांचे विश्वासू मानले जात होते. मात्र, वाणींनी सत्ताधारी पक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याचे मानण्यात येत आहे.
वाणी यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना राजीनाम्याबाबत पत्र लिहून याबाबत कळविले आहे. त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, पक्षात सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिला जाईल असे वाटले होते. मात्र
आपला भ्रमनिरास झाला आहे. या पक्षात फक्त नात्या-गोत्यातील लोकांना व खुष मस्क-यांनाच संधी दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान याबाबत सांगितले जात आहे की, वाणी हे मागील दोन महिन्यांपासून भाजपच्या संपर्कात होते. इतर आणखी काही नेते घेऊन भाजपात प्रवेश करू मात्र त्याबदल्यात भविष्यात विधान परिषदेचे सदस्यत्व मिळावे अशी अट होती. मात्र भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील एका खासदाराने वाणींच्या मागणीला फेटाळून लावले. त्यामुळे पक्षप्रवेश लांबला होता. वाणी हे मूळचे जळगाव भागातील उत्तर महाराष्ट्रातील नेते आहेत. मात्र, मागील 40 वर्षापासून त्यांचे कार्यक्षेत्र पिंपरी-चिंचवड शहर राहिले आहे. मात्र, जनमानसात त्यांना विशेष स्थान नाही. संघाच्या मुशीत घडलेले व भाजपचे नगरसेवक राहिलेले वाणी हे मागील काही वर्षांपासून सत्ताधारी राष्ट्रवादीत गेले होते. विधान परिषदेवर आपल्याला संधी मिळावी असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, पक्षाला त्यांचा काहीही उपयोग नसल्याने पवारांनी त्यांनी मागणी धुडकावून लावली होती. त्यात पवारांचे निकटवर्तीय व पक्षाचे खजिनदार हेमंत टकले यांनी आमदारकी दिल्यानंतर वाणी अस्वस्थ होते. अखेर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.