आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या नवविवाहितेचा पुण्यात संशयास्पद मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आठ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या औरंगाबाद येथील महिलेचा पुण्यातील पिंपळे गुरव भागात संशयास्पद मृत्यू झाला. पैशासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळातूनच तिचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली आहे. तसेच आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृतदेह पोलिस ठाण्यातही आणला होता. दरम्यान, पोलिसांनी पतीसह पाच जणांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा मृतदेह औरंगाबादला नेण्यात आला.
स्नेहल अजिंक्य क्षीरसागर (21) असे मृत महिलेचे नाव असून, तिचे वडील संजय मोहन पागोरे (48, रा.दीपकनगर, औरंगाबाद) यांनी सासरच्या मंडळींविरोधात सांगवी पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. अजिंक्य व स्नेहल यांचा विवाह 12 मे 2013 रोजी झाला. अजिंक्य हा पुणे पालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे माहेरहून पैसे आण म्हणून तो सतत स्नेहलकडे तगादा लावत असे. आई-वडील व बहिणींच्या मदतीने पैशासाठी तो नेहमी स्नेहलचा मानसिक व शारीरिक छळ करत असे.
या जाच सहन न झाल्याने स्नेहलने मंगळवारी औरंगाबादेत माहेरी फोन करून ‘मला घेऊन जा,’ असे विनवले होते. तिच्या वडिलांनी पुण्यातील आपली बहीण निर्मला देवकर हिला तातडीने स्नेहलकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार देवकर दांपत्य तिच्या घरी गेले असता त्यांना स्नेहलला औंध येथील रुग्णालयात नेल्याचे समजले. तिथे पोहोचले असता स्नेहलचा मृत्यू झाल्याचीच बातमी त्यांच्या कानी पडली. दरम्यान, वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर स्नेहलचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादला नेण्यात आला.
दोनदा शवविच्छेदन : औंध रुग्णालयात शवविच्छेदन झाले. स्नेहलचा मृत्यू गळफास घेऊन झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला, परंतु गळ्यावर खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
सासू, सासरे ताब्यात; पती फरार
औरंगाबादहून आलेल्या स्नेहलच्या कुटुंबीयांनी तातडीने सांगवी पोलिस चौकी गाठली व जावयासह क्षीरसागर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी टाळाटाळ केल्याने त्यांनी मृतदेहच पोलिस चौकीत नेला, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी पती अजिंक्य क्षीरसागर (28), सासरा सुभाष क्षीरसागर, सासू मंगला, नणंद जुई व सुषमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सासू व सासर्‍यांना ताब्यात घेतले असून अजिंक्य हा पसार झाला आहे.