आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FTII बेशिस्तांवर कारवाईचा बडगा, 43 विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’तील (एफटीआयआय) अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरही संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांना गाशा गुंडाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, वर्षानुवर्षे अभ्यासक्रम पूर्ण न करता जागा अडवून ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. ‘एफटीआयआय’चे संचालक प्रशांत पाठराबे यांनी ही माहिती दिली.

सन २००८ मध्ये प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण न केल्याने अजूनही त्यांचे त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेले नाहीत. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला ७ वर्षे लावणाऱ्या या विद्यार्थ्यांचे रखडलेल्या या प्रोजेक्टचे जसे असतील त्या स्थितीत मूल्यमापन केले जाणार आहे, अशी माहिती पाठराबे यांनी दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही लवकरच संस्थेतून बाहेर पडावे लागणार आहे.

संस्थेचे नूतन अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या निवडीला विरोध करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न सरकारने चालवला असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. आंदोलन विद्यार्थ्यांनी संस्थेवर बहिष्कार टाकल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अद्याप होऊ शकलेली नाही. यामुळेच एफटीआयआयमध्ये शिकवण्यासाठी येणाऱ्या ८२ कंत्राटी अध्यापकांनाही एक सप्टेंबरपासून कामावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अस्वस्थतेमुळे वर्ग भरत नसताना कंत्राटी अध्यापकांना अकारण गुंतवून ठेवण्यात अर्थ नाही, असे पाठराबे यांनी स्पष्ट केले.

चौहान अजून बाहेरच
गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. यामुळे चौहान अजूनपर्यंत एफटीआयआयकडे फिरकलेले नाहीत. केंद्रीय मंत्रालयाने सूचना दिल्याशिवाय मी संस्थेत जाणार नाही, असे चौहान यांनी स्पष्ट केले आहे.

बेशिस्तीचा कळस
-सन १९९७ पासून संस्थेत पदवीदान सोहळा झालेला नाही.
-सन २००८ मध्ये तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला आलेले विद्यार्थी अजूनही वसतिगृहातच मुक्कामी.
-विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगमुळे समस्या.

आठ- आठ वर्षे वसतिगृहात मुक्काम
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी नुकतेच कारवाई करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार संस्थेतल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली जात आहे. संस्थेच्या वसतिगृहात आठ-आठ वर्षे विद्यार्थी का राहतात, याचा शोध घेतला जात आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातल्या जागा अडवल्याने नव्या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळू शकत नाही. अभ्यासक्रम रखडलेले विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे वसतिगृहात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. नव्या प्रशासकीय व शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न झाल्यास या विद्यार्थ्यांकडून विरोध होतो. अनेक वर्षे संस्थेत जागा अडवून बसलेल्या बेशिस्त विद्यार्थ्यांमुळेच संस्थेतले शैक्षणिक वातावरण बिघडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-एफटीआयआयमधल्या विद्यार्थ्यांचा ९४ टक्के खर्च केंद्राच्या तिजोरीतून म्हणजेच जनतेच्या पैशांतून होतो. सन २०१४-१५ मध्ये संस्थेच्या नूतनीकरणासाठीही ८० कोटी रुपये देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...