आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीची वाट लावणारा जन्मायचाय, अजित पवार यांची महादेव जानकर यांच्यावर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीवर टीका न करता विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जावे. कोणी म्हणेल मी बारामतीची वाट लावतो. बारामतीची वाट लावणारा जन्माला यायचा आहे. एकवेळ अजित पवारांची वाट लावतो, असे म्हटले असते तर मी गप्प बसलो असतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर शनिवारी केली.

पवार म्हणाले, बारामतीत सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सधी मिळते. आम्हीदेखील कडक शब्दांत टीका केली. मात्र, कमरेखालचे वार केले नाहीत. कुठे चुकल्यास आत्मक्लेष केला. कारण माणूस असल्याने चुकतो.

भगवानगड येथील सभेत महादेव जानकर यांनी बारामतीचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पवार आणि जानकर यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. सरकारमध्ये असताना आम्हीदेखील विरोधकांची सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नसलो तरी बारामतीचा विकास होत राहणार आहे. वाचाळवीरांना थोपवण्याचे निवडणूक हे उत्तम साधन असून सध्याच्या सरकारमधील नेत्यांनी आरक्षण तसेच ऊस दराचे आंदोलन बारामतीत कसे होईल याबद्दल काळजी घेतली. बारामतीमधील जातीय सलोख्याला धक्का पोचवण्याचे काम झाले, असा आरोपही अजित पवार यांनी केला.

लाल दिवा मिळाल्याने शेतकरी नेत्यांच्या तोंडातून शब्द फुटेना
काही महिन्यांपूर्वी ऊस दराच्या मुद्द्यावरून बारामतीला लक्ष्य केले जात होते. आघाडी सरकारच्या काळात जेवढा ऊस दर होता. तेवढाच ऊसदर अाजही आहे. मात्र, शेतकरी नेते म्हणवून घेणारे सरकारमधील मंत्री आता लाल दिवा मिळाल्याने मौन बाळगून असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या संस्थेत भ्रष्टाचार दाखवा
राज्यात काम करत असताना माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याची चौकशी सुरू आहे. मी कायद्याचा आदर करणारा माणूस आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील पुणे जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महापालिका, पुणे जिल्हा सहकारी बँक, पुणे जिल्हा दूध संघ, सहकारी साखर कारखाने इत्यादी संस्थांत कोणी एका पैशाचा भ्रष्टाचार दाखवून द्यावा, असे खुले अाव्हान अजित पवार यांनी विरोधकांना दिले.
बातम्या आणखी आहेत...