आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगडाच्या नगररचनेवरील संशाेधन आर्किटेक्चरल ड्रॉइंग्ज’मधून येणार ग्रंथरूपात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे स्थान, हिंदवी स्वराज्याची राजधानी असणारा दुर्गराज रायगड लवकरच ‘आर्किटेक्चरल ड्रॉइंग्ज’च्या (वास्तू-अवशेषांची संशोधित रेखांकने) माध्यमातून वाचकांसमोर येणार आहे. रायगडावरील वास्तू-अवशेषांच्या पुराव्यांतून गडावरील मूळ नगररचना नेमकी कशा प्रकारची होती, याचा मागोवा ज्येष्ठ आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकर यांनी घेतला असून, तो ग्रंथरूपाने वाचकांसमोर येणार आहे. चांदोरकर यांनी या अभ्यासासाठी ३७ वर्षांचे संशोधन केले आहे. या दरम्यान त्यांनी दोनशेहून अधिक वेळा रायगडाला भेट दिली असून, १४०० हून अधिक तास गडावर संशोधनाचे काम केले आहे.   

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची उभारणी, बांधणी नेमकी कशा प्रकारे केली होती, कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू गडावर होत्या, त्यांचे अवशेषरूप कोणती वस्तुस्थिती समोर आणतात, हे अनुभवी आर्किटेक्टच्या नजरेतून पाहण्याचा माझा प्रयत्न आहे’, असे गोपाळ चांदोरकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. एखादा अभ्यासक ज्या तज्ज्ञतेने, जिज्ञासेने, जाणकारीने ऐतिहासिक कागदपत्र वाचेल, हाताळेल, समजून घेईल, त्याच पद्धतीने मी गडावरील प्रत्येक वास्तूअवशेषाचा वास्तूरचनाकाराच्या नजरेतून अभ्यास केला आहे. त्यातून कित्येक नवीन गोष्टींचा उलगडा झाला. ते सर्व या ग्रंथातून मांडणार आहे, असे ते म्हणाले.   

- वास्तूअवशेषांमधून उलगडलेली वैशिष्ट्ये  
- दुर्गावरील पहिला नाट्यमंडप रायगडावर होता  
- पहिले पर्जन्यमापक यंत्र रायगडावर होते  
- व्हेंट पाऊप व काऊलसह शौचालये अस्तित्वात होती  
- प्रशासकीय कामकाजासाठी ४४ कचेऱ्या होत्या  
- तेव्हाही डिझाइन केलेली घरे होती  
- सांडपाण्याचे व्यवस्थापन उत्तम 

अादर्श राज्यकर्ता 
शिवाजी महाराजांना अनेक जण फक्त ‘योद्धा’ म्हणून पाहतात. प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचे राज्यकर्ता हे रूपही अत्यंत आदर्श होते. असंख्य प्रकारचे बारकावे त्यांनी रायगडाच्या उभारणीसाठी योजिलेले दिसतात. ‘वॉरियर’ शिवछत्रपतींप्रमाणेच त्यांचे हे रूपही सर्वांसमोर यावे, असे वाटते. किती प्रकारची तज्ज्ञता त्यांच्यापाशी होती, याची कल्पना त्यातून येईल.   
गोपाळ चांदोरकर, आर्किटेक्चरल ड्रॉइंग्ज तज्ज्ञ आणि ज्येष्ठ संशोधक  

चार भागांत रायगड उलगडण्याचा संकल्प   
वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या गोपाळ चांदोरकरांनी रायगडावर चार भागांत ग्रंथलेखनाचा संकल्प व्यक्त केला. रायगडावरील या पुस्तक चतुष्ट्याला त्यांनी ‘श्रीमद् रायगिरौ’ असे शीर्षक दिले आहे.  त्यातील पहिल्या भागात रायगड नगररचना आणि वास्तू अभ्यास यांचा समावेश असेल. दुसऱ्या भागात बालेकिल्ला, तिसऱ्या भागात उर्वरित रायगड व परिसर तर अखेरच्या भागात मूळ ड्रॉइंग्ज, वस्तूंचे नकाशे आणि छायाचित्रांचा समावेश असेल.
बातम्या आणखी आहेत...