आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सरासरी ९७.४ टक्के पाऊस; मराठवाड्यात ११६.९ टक्के, कोकणात ११५.८ टक्के

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) रविवारी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला. यंदा राज्यात १९ जूनला उशिरा दाखल झालेला मान्सून १२० दिवसांच्या मुक्कामानंतर महाराष्ट्रातून परतल्यानंतर यंदाच्या पावसाळ्याचा अधिकृत शेवट झाला आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत यंदा ९७.४ टक्के पाऊस झाला. कोकण आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त अनुक्रमे ११५.८ आणि ११६.९ टक्के पाऊस नोंदला गेला.
मान्सूनचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास शुक्रवारी १४ ऑक्टोबरला सुरू झाला होता. दोनच दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परत फिरला आहे. महाराष्ट्राबरोबरच बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, छत्तीसगड तसेच पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील राज्यांमधूनही मान्सूनने काढता पाय घेतला. आता केवळ आंध्र प्रदेश व कर्नाटकचा काही भाग आणि तामिळनाडू, केरळ व अंदमान-निकोबर बेटांवर मान्सून आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या भागातूनही तो परत फिरण्यासाठी अनुकूल हवामान स्थिती आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे पडसाद राज्यात स्पष्ट दिसले आहेत. राज्यात कोठेही दमदार पावसाचे वृत्त नाही. गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणच्या पावसाचा अपवाद वगळता राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे होते. पुढच्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
यंदाच्या पावसाळा कोकण आणि मराठवाड्यासाठी सर्वाधिक समाधानकारक ठरला. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरी ११३६.३ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत फक्त ७७ टक्के पाऊस झाला होता. यंदाच्या पावसाची टक्केवारी ९७.५ आहे. कोकणात ३ हजार ४९९ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक विभागात ६८५ मिलिमीटर, पुण्यात ८६६ मिलिमीटर, तर औरंगाबाद विभागात ८७८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अमरावती आणि नागपूर विभागात अनुक्रमे ७९८.४ व १०४२.७ मिलिमीटर पाऊस झाला.
पाणीसाठ्यात ४० टक्के वाढ
राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांची संख्या ३ हजार ५२८ आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ३३ हजार ५४० दशलक्ष घनमीटर एवढा झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी फक्त ४४.३४ टक्के होती. यंदा यात तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली असून ती आता ८३.७६ टक्के झाली आहे. त्यामुळे राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला अाहे.
सह्याद्रीत मुसळधार
राज्यात सर्वदूर यंदा समाधानकारक पाऊस झाला. सह्याद्री डोंगररांगावर मात्र पावसाचा अभूतपूर्व जोर होता. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वसलेल्या पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमधल्या कैक गावे आणि वाड्यावस्त्यांना तीन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपून काढले.
मान्सूनचे आगमन
{१८ मे – अंदमानात दाखल
{ ८ जून – केरळ किनारपट्टी ओलांडली
{ १९ जून – तळकोकणात मान्सूनचे आगमन
{ २१ जून – संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला
मान्सूनची माघार
}१५ सप्टेंबर – पश्चिम राजस्थानातून मान्सून माघारी फिरला.
} १४ ऑक्टोबर – उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मध्य व उत्तर भारतातून परतला.
} १६ ऑक्टोबर – महाराष्ट्रासह उत्तर, मध्य आणि ईशान्य भारतातून माघार.
राज्यातील यंदाची सर्वाधिक पावसाची गावे पुढीलप्रमाणे
{शिरगाव (रत्नागिरी) – ९ हजार ५०४ मिमी.
{लामज (सातारा) – ८ हजार ३० मिमी.
{आंबोली (सिंधुदुर्ग) – ६ हजार ८५६ मिमी.
{महाबळेश्वर (सातारा) – ६ हजार ८३२ मिमी.
स्रोत : जलसंपदा विभाग
बातम्या आणखी आहेत...